Nana Patole, Eknath Shinde News : कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आले आहे. आता सर्व राज्यांमधून भाजपची सत्ता लोकं काढणार हे निश्चित आहे. त्यामुळे 2014 आणि 2019 च्या लोकसभेची कथा कुणी सांगायची गरज नाही. पाचोळा कोणाचा होणार आहे, हे देशातली जनता ठरवणार आहे. त्यामुळे घाई करू नका मुख्यमंत्री महोदय... निवडणुका लावा, म्हणजे कळेल तुम्हाला, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
काँग्रेसच्या वतीने हाथ से हाथ जोडो अभियान राबविण्यात येत आहे. कल्याण-डोंबिवली मधील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे गुरुवारी डोंबिवलीत आले होते. यावेळी संतोष केणे, सचिन पोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी 2019 च्या लाटेमध्ये विरोधक पालापाचोळ्या सारखे उडून गेले, असे विधान केले होते. त्या विधानाला उत्तर देताना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना घाई न करण्याचा सल्ला देत सांगितले, ''इंदिराजींच्या लाटेमध्ये अनेक विरोधात त्या काळात उडून गेले आहेत. हे फक्त दहा वर्षाच्या कालावधीत आता लोकांना कळायला लागलेले आहे की या घोषणा, फेकूगिरी, खोटे स्वप्न दाखवून लोकांचे पोट भरले जात नाही. लोकांना लुटले जाते आणि देशांमध्ये जे फक्त घोषणा करून सत्तेत आलेले आहेत, स्वप्न दाखवून आलेले आहेत, त्यांच्यामुळे लोकांचे स्वप्नभंग झालेले आहे. आता कर्नाटकमध्ये सरकार आले. आता सर्व राज्यांमधून भाजपच्या सत्ता लोके काढणार हे निश्चित आहे. त्यामुळे 14 आणि 19 ची कथा कुणी सांगायची गरज नाही, असा जोरदार टोला पटोले यांनी लगावला.
मणिपूरमध्ये डबल इंजिन सांगताहेत. मात्र, डबल इंजिनचा अर्थ काय असतो? एक इंजिन नापास झाले की दुसरे इंजिन लावावे लागते आणि त्याला ढकलावे लागते. मणिपूरमध्ये काय केले डबल इंजिनचा सरकारने? तिथे आदिवासींना मारले जाते, जाळपोळ केली जाते, ख्रिश्चनांच्या चर्च जाळल्या जातात. ही देशातली व्यवस्था नाही. देशांमध्ये सर्वधर्मसमभावाची संविधानाने दिलेली जी शिकवण आहे, त्याचे पालन केले पाहिजे, असे पटोले म्हणाले.
सत्तेत राहून दुसऱ्या धर्माला मारायचे आणि तिसरा धर्माला जिवंत ठेवायचे. भाजपचे (BJP) नकली हिंदुत्वा लोकांना कळले आहे. ती लोकांना आता लक्षात आलेली आहे. त्यामुळे पाचोळा कोणाचा होणार आहे, हे देशातली जनता ठरवणार आहे. त्यामुळे घाई करू नका निवडणुका लावा, म्हणजे कळेल तुम्हाला असे पटोले म्हणाले.
मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? यावर बोलताना पटोले म्हणाले, कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. मात्र, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची (Congress) सत्ता आली पाहिजे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याच मनात तसे नाही, तर जनतेच्या मनात सुद्धा तसे आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हायकमांड घेते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा अतिउत्साह आहे आणि कार्यकर्त्यांना ही माझी विनंती आहे आधी तुमच्या भागातले आमदार निवडून आणा. त्यासाठी लोकांमध्ये जा आणि जास्तीत जास्त आमदार आपापल्या भागातून निवडून आणा, मग काँग्रेसचे मुख्यमंत्री होणारच...असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
नंतर मुख्यमंत्रीपदावरून वाद होणार नाहीत ना? या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले, सगळ्याच पक्षामध्ये चाललेले आहे. काही लोक स्वतःच म्हणतात की मी पुन्हा येईल, त्यामुळे आमच्यात तसे नाहीये. कार्यकर्त्यांचा उत्साह आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे, लोक उपाशी मरतायत, महागाई वाढत चालली आहे, हे प्रश्न असताना बाहेरच्या देशातून चित्ते आणायचे हा शौक कुठले प्रधानमंत्री पाळत आहेत?
आता तो एक एक चित्ता मरतोय. इतका खर्च करून जनतेचे पैसे खर्च करून चित्ते आणले आहेत. त्याची काळजी सरकारला आहे. मात्र, इथे लोक उपाशी मरतायेत, बेरोजगारीने मरतायेत, त्याची चिंता देशाचे प्रधानमंत्री करत नाहीत. हा शौकच आहे. जनतेचा पैसा आणि सत्तेचा दुरुपयोग आहे.
देशात आज संविधानिक व्यवस्थेचे तीन तेरा वाजवण्याचे काम सुरू आहे. नवीन संसद इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवे होते. पण प्रधानमंत्री स्वतः उद्घाटन करणार आहेत. विटा सिमेंट आणि लोखंडाने बनलेल्या संसद इमारतीत खऱ्या अर्थाने संसदीय मूल्य जोपासले गेले पाहिजे. ते सुद्धा राज्यकर्त्यांना कळत नसेल? राष्ट्रपती या लोकसभा आणि राज्यसभेच्या प्रमुख असतात. सरकारने घेतलेल्या निर्णयांना मान्यता राष्ट्रपती देत असतात. इतके मोठे हे राष्ट्रपती पद आहे. तरीही आदिवासी महिला असलेल्या राष्ट्रपती पदाची अवहेलना आणि त्या पदाचा अवमान करण्याचे काम प्रधानमंत्र्यांकडून केले जात आहे.
त्यामुळे या सगळ्या गोष्टीविरोधात देशातल्या सगळ्या लोकांनी आणि राजकीय पक्षांनी एकत्र यावे अशी भूमिका काँग्रेसची आहे. त्यासाठी सोनिया गांधी यांच्या आदेशाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना समन्वयक केलेले आहे. सगळ्या राज्यस्तरीय पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे.
नंतरही काँग्रेसची भूमिका कायम राहील का?
-राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झाले तर सगळे पक्ष उद्घाटनाला जाणार. आपल्या देशात लोकशाहीला मजबूत ठेवण्याचे काम हे संविधानाने केले आहे. संविधानामध्ये अधिकार ज्याचे त्याला दिले आहे. त्याप्रमाणे व्यवस्था व्हावी. संविधानाला संपवण्याचे काम होत असेल तर ज्यांना याबाबत काळजी आहे त्यांनी याचा विरोध केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे की, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलात तर नुकसान होईल, या विषयी विचारले असता पटोले म्हणाले, प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये नाहीत. उद्धव ठाकरेंसोबत त्यांची युती झाली आहे, असे ते सांगतात. त्यामुळे त्यांनी काय बोलावे, काय नाही, यावर आम्ही प्रतिक्रिया देणार नाही. लोक रडत आहेत आणि हे हसत आहे. एक दाढीवाला आणि एक बिना मिशीवाला, असा चिमटा नाना पटोले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काढला.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.