Nana Patole KCR News : तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (BRS) ही भारतीय जनता पक्षाची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो. हे राज्यातील जनतेला माहित आहे. तेलंगाणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. त्यांचे अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले ''तेलंगणातील (Telangana) भारत राष्ट्र समिती महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस विचाराचेच सरकार यावे ही वारकरी व जनतेची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
तेलंगणात केसीआर यांच्या पक्षाने काय केले याची सर्व माहिती काँग्रेसकडे (Congress) आहे. लवकर या फसव्या तेलंगणा पॅटर्नची पोलखोल करु, असा स्पष्ट इशाराही पटोले यांनी दिला. केसीआर यांनी ९ वर्षात तेलंगणात कोणतेही काम केलेले नाही. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मागासवर्गीयांसाठी त्यांनी ठोस असे काहीही केलेले नाही. आताही कांद्याला तेलंगणात जास्त भाव असल्याचे सांगितले जात होते. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणात कांदा विक्रीस नेला असता त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
केसीआर सरकार फक्त मोठ-मोठ्या जाहीराती देऊन काम केल्याचा डांगोरा पिटत आहे. जो काम करतो त्याला जाहीरातबाजी करण्याची आवश्यकता भासत नाही, असेही पटोले म्हणाले. पंढरपूरमध्ये आषाढीवारी होत आहे. या वारीत हैदराबादहून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर ६०० गाड्यांचा ताफा घेऊन येत असल्याची माहिती समजते. पंढरपुरात आषाढी वारीला १० लाख वारकरी जमतात, त्यात केसीआर यांनी बाहेरुन आणखी लोक आणून गर्दी करायची हे बरोबर आहे का? पंढरपूरचा विठोबा हा श्रद्धेचा, आस्थेचा विषय आहे, त्याचा कोणी राजकीय फायदा उठवत असेल तर योग्य नाही, असेही पटोले म्हणाले.
आणीबाणीवर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही..
दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू केली होती. याचा भाजपाने निट अभ्यास करायला पाहिजे. भाजपाला इतिहासच नाही त्यावर ते काय बोलणार? १९७५ मध्ये अमेरिका-व्हिएतनाम युद्ध सूरू होते. त्याच वेळी देशामधील लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी काही लोकांनी षडयंत्र रचले होते. काही लोक जाणीवपूर्वक चिथावणी देत होते. इंदिराजींनी आणीबाणी लावली नसती तर देशात लोकशाही राहिली नसती. इंदिराजी गांधी यांनी १८ महिन्यानंतर आणीबाणी उठवली व निवडणुकाही घेतल्या. इंदिराजी गांधी लोकशाहीच्या पाईक होत्या म्हणून लोकशाही वाचली, असे पटोले म्हणाले.
काँग्रेस पक्षाने आणीबाणीबद्दल नंतर माफीही मागितली. मात्र, आता देशात काय चालले आहे? आणीबाणीपेक्षाही भयानक परिस्थिती आहे. लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून कारभार सुरु आहे. ९ वर्षापासून देशात अघोषीत आणीबाणी सुरू आहे. त्यावर भाजपाने आधी बोलले पाहिजे.
मोदी सरकारच्या विरोधात बोलणा-यावर कारवाई केली जाते. सरकारी तपास यंत्रणाचा वारेमाप गैरवापर सुरु आहे. विरोधकांची दडपशाही सुरु असून सरकारविरोधात बोलणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. आणीबाणीच्या नावाखाली भाजपा तरूणांना भडकवत आहे, ते त्यांनी थांबवावे. भाजपाला (BJP) आणीबाणीवर बोलण्याचा अधिकार नाही, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
राज्यातील शिंदे-फडणीस सरकार हे घोषणाबाजी व जाहीरातबाजी सरकार आहे. काम काहीच करत नाही फक्त गाजावाजा करत असतात. पहिल्याच पावसाने या सरकारच्या दाव्यांची पोलखोल केली. मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. ६ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला. मुंबईत जागोजागी खड्डे खणून ठेवले आहे. नालेसफाईसह मुंबईच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र, मुंबई पाण्यात गेली, मग खर्च केलेला पैसा गेला कुठे? असा सवालही पटोल यांनी केला.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.