BJP on Congress Sarkarnama
मुंबई

BJP on Congress: युवक काँग्रेसच्या बैठकीत तुफान राडा : काँग्रेसने आपली संस्कृती दाखवलीच; भाजपची टीका

Youth Congress News : युवक काँग्रेसमध्ये झालेल्या वादावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : युवक काँग्रेसच्या बैठकीत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली असून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. युवक काँग्रेसच्याच दोन गटात हा वाद झाल्याने युवक काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचा अंतर्गत वाद उफाळून आला आहे. या वादाची सध्या मोठी चर्चा रंगली आहे.

युवक काँग्रेसमध्ये झालेल्या या वादावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी या युवक काँग्रेसच्या वादावरून काँग्रेसच्या घराणेशाही आणि अशा हाणामारी संस्कृतीतून काँग्रेस नक्की युवकांना काय संदेश देऊ इच्छिते?, असा सवाल उपस्थित केला आहे.

विक्रांत पाटील नेमकं काय म्हणाले?

"युवक काँग्रेसच्या राज्य कार्यकारणी बैठकीत दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली. काँग्रेस पक्षात केवळ घराणेशाही सुरू असून प्रस्थापित नेत्यांच्याच मुलांना संधी दिली जाते, असा आरोप युवक काँग्रेसचेच पदाधिकारी करत आहेत.

आज याच विषयाला घेऊन काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रभारी व नेत्यांसमोर कार्यकर्त्यांची हाणामारी झाली. 'भारत जोडो यात्रे'ची नौटंकी करणाऱ्या राहुल गांधी यांनी आधी आपल्या कार्यकर्त्यांची मन जोडण्याचा प्रयत्न करावा. काँग्रेसच्या घराणेशाही आणि अशा हाणामारी संस्कृतीतून काँग्रेस नक्की युवांना काय संदेश देऊ इच्छिते?, याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे, असा सवाल भाजपचे सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी केला आहे.

युवक काँग्रेसच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

माहितीनुसार, युवक काँग्रेसच्या बैठकीत दोन गटात हाणामारी झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत काही कार्यकर्ते भिडले. शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे या गटाने कुणाल राऊत यांचा विरोध केला.

युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या कामकाजावर या गटाने नाराजी व्यक्त करत या गटाने त्यांना बदलण्याची मागणी केली आहे. त्यानंतर बैठकीत काही कार्यकर्ते आक्रमक झाले. यावरुन वाद होऊन बैठकीत दोन गट एकमेकांना भिडले. यावेळी काही कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. युवक काँग्रेसच्या चार उपाध्यक्षांनी राऊत यांना पदावरून हटविण्याची मागणी केली.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT