Rohit Pawar News
Rohit Pawar News Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar News : शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका, तरी गप्प का ? रोहित पवारांचा पक्षातील वरिष्ठ नेत्यांना संतप्त सवाल

सरकारनामा ब्यूरो

Pune : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करताना त्यांचा एकेरी उल्लेख केला होता. यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी स्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांवर आगपाखड करतानाच त्यांना संतप्त सवाल केला आहे.

आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेते मुनगंटीवारांवर हल्लाबोल करतानाच स्वपक्षीय नेत्यांचाही खरपूस समाचार घेतला आहे. पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका झाल्यानंतर अजित पवार यांनीच बोलण्याचा ठेका घेतला आहे का? असा सवाल पवार यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना खडेबोल सुनावलं आहे. राष्ट्रवादीचे इतर नेते का बोलत नाहीत? वाचाळवीरांना का प्रतिक्रिया देत नाहीत? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

''आता शरद पवारांवर जो कोणी बोलेल, त्याला...''

शरद पवारांनी अनेक नेत्यांना मोठं केलं. पण, शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन बोललं जातं, तेव्हा कार्यकर्तेच लढतात. ही गोष्ट पाहिल्यावर मलाही खंत वाटते. ज्या नेत्यांनी पदं भूषवली आहेत, ते याबद्दल काहीच बोलत नाहीत. फक्त अजित पवारां(Ajit Pawar) नी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, बाकीचे सर्व शांत बसले आहेत. आम्ही कार्यकर्ता म्हणून लढत राहू. शरद पवारांवर जो कोणी बोलेल, त्याला उत्तर देऊ. पण, नेते गप्प का बसतात हे कळत नाही रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

''मुनगंटीवारांकडून ही अपेक्षा नव्हती!''

आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारां(Sharad Pawar) वर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, महाराष्ट्रात काही नवीन तयार झालेले नेते खालच्या पातळीवर जाऊन बोलत पदाची अपेक्षा करत असावेत. भाजपाचे स्वयंघोषित नेते खालच्या पातळीवर बोलतात. तेव्हा वरिष्ठ नेते शांत असतात. याचा अर्थ त्यांचेही याला पाठबळ असल्याचं दिसतं. मुनगंटीवार यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती अशा शब्दांत रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अजित पवारांचा हल्लाबोल..

सुधीर मुनगंटीवार आणि गोपीचंद पडळकरांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली होती. पवार म्हणाले, संस्कार होतील, तसेच ते बोलणार आणि वागणार. पण मुनगंटीवार यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण, दुसऱ्यांकडून कशाचीही अपेक्षा नाही. त्यावर बोलू शकत नाही असं म्हणत पडळकरांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता.

मुनगंटीवार काय म्हणाले होते ?

सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) य़ांनी शरद पवारांवर टीका करताना ओबीसांचा पंतप्रधान झाल्याने यांच्या ( काँग्रेस-राष्ट्रवादी ) पोटात दुखत आहे. काँग्रेसचा पंतप्रधान कोण आहे? तर एक ब्राह्मण आहे, जो जानवं घालतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वर्षांपासून अध्यक्ष कोण आहे? मराठा शरद पवार, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? असं मुनगंटीवार म्हणाले होते.

पडळकरांची जीभ घसरली...

भाजप आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar)यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरुन पवारांवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी पवारांचा एकेरी उल्लेख केला होता. गेल्यावर्षी जयंतीला पवारांनी मस्ती केली, केली का नाही? यावर्षी पवार का नाही आला? पवार ४ वेळा मुख्यमंत्री, १२ वर्षे केंद्रात मंत्री होता. मागचं मला माहिती नाही. राज्यात १९९९ पासून २०१४ पर्यंत त्यांचं सरकार होतं, ते एकदाही चौंडीला आले नाहीत. गेल्यावर्षी त्यांना आपली चौंडी काढून घ्यायची होती असा आरोप गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT