Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut: दिल्लीतील साहित्य संमेलनात राजकारण्यांचीच भाऊगर्दी; मराठीला काय मिळालं?

Sanjay Raut ON Delhi Marathi Sahitya Sammela 2025: स्वागताध्यक्ष शरद पवार हे झाल्याने निदान राजकीय समतोल साधला. शरद पवार हे निदान साहित्यिक, कलावंतांशी संबंध ठेवतात,

Mangesh Mahale

Delhi Marathi Sahitya Sammela: दिल्ली येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप आहे, या संमेलनावर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील 'रोखठोक'मधून कागदी बाण सोडले आहेत.

संमेलनात मराठी विषयापेक्षा राजकीय विषयावर चर्चा झाली. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय वापर उघडपणे झाला, असा आरोप 'रोखठोक'मधून खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दिल्लीच्या साहित्य संमेलनातूनाच्या राजकीय कुंभातून मराठीला काय मिळाले, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण तापले आहे. या दोन्ही प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी राज्यभरातून होत आहे. याकरिता राज्यातील अनेक भागांमधून मोर्चे देखील काढण्यात आले. पण आता याच मुद्द्यावरून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर राऊतांनी आयोजकांना काही 'रोखठोक' सवाल केले आहेत.

दिल्लीतील साहित्य संमेलनात राजकारण्यांचीच भाऊगर्दी जास्त हे चित्र दिसले. दिल्लीत भाजपचे मंत्री व खासदार त्यात आघाडीवर. हे त्यांच्या घरचेच कार्य जणू होते. दिल्लीच्या संमेलनास आधी कोणी यायला तयार नव्हते. भाजपच्या संमेलनावरील आढमणापुढे आपला निभाव लागेल काय? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. कारण संमेलनावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून झाला. भाजपमुळे हे संमेलन दिल्लीत घडत आहे, हा प्रचार आताही सुरू आहे. तरीही लोक संमेलनास दिल्लीत पोहोचले ते मराठीवरील प्रेमापोटी. तरीही साहित्यिक, माजी अध्यक्ष, साहित्यविषयक संस्था दिल्लीत मोठ्या प्रमाणात आल्याचे चित्र दिसत नाही, असे राऊतांनी सांगितले.

संमेलनाचे मावळते अध्यक्ष रवींद्र शोभणे यांना उद्घाटन सोहळ्यात स्थान नव्हते. कारण पंतप्रधान कार्यालयाने त्यांचे नाव कापले, पण मंचावरील राजकारण्यांची नावे कापली नाहीत. संमेलन साहित्यिकांचे आहे व त्यांनाच कापायचे. उद्घाटक पंतप्रधान मोदी व स्वागताध्यक्ष श्री. शरद पवार हे झाल्याने निदान राजकीय समतोल साधला. शरद पवार हे निदान साहित्यिक, कलावंतांशी संबंध ठेवतात, लिहितात आणि वाचतात. यशवंतराव चव्हाणांपासून ही परंपरा आहे, असे राऊत म्हणाले.

आणीबाणीच्या काळात राजकारण्यांनी संमेलनात येऊ नये व संमेलन नासवू नये, अशी भूमिका घेणाऱ्यांत दुर्गाबाई भागवत पुढे होत्या आणि त्यांनी समांतर साहित्य संमेलन घेतले. तेव्हा दुर्गाबाईंचे समर्थन करणाऱ्यांत तेव्हाच्या जनसंघाचे लोक जास्त होते, पण आता त्यांनी दिल्लीचे संमेलनच हायजाक केले. अर्थात राजकारण्यांच्या मदतीशिवाय व सत्ताधाऱ्यांच्या निधीदानाशिवाय आपले साहित्य सोहळे होत नाहीत. त्यामुळे साहित्यिकांच्या मंचावर राजकारण्यांचा वावर जास्त दिसतो. तो या वेळी दिल्लीत जास्त दिसला. ”साहित्य संमेलनाच्या मुख्य मांडवास नथुराम गोडसेंचे नाव द्या” ही मागणी काही लोकांनी केली व त्यासाठी आयोजकांवर दबाव आणला. एकाही साहित्यिकाने याबाबत निर्भय आणि उघड भूमिका घेतली नाही, अशी खंत राऊतांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीच्या संमेलनात निमंत्रणावरून शेवटपर्यंत गोंधळाचे चित्र राहिले. मराठी साहित्य महामंडळ आणि पुण्याची ‘सरहद’ संस्था हे आयोजक गोंधळाचे खापर एकमेकांवर फोडत आहेत. दिल्लीत मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकीय ‘गेट-टु-गेदर’ करण्यातच त्यांना जास्त रस दिसतो. कारण उपराष्ट्रपतींपासून अनेकांनी दिल्लीत मराठी साहित्य महामंडळ व संमेलनाच्या अध्यक्षांना चहापानासाठी बोलावून सत्कार केला, यातच सगळे खूश. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय वापर उघडपणे झाला, असे राऊत यांचे म्हणणं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT