मुंबई : राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना पाहून 'म्याव... म्याव...करीत डिवचणारे भाजपचे आमदार नितेश राणेंना (Nitesh Rane) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटकारले. 'आपण, कोंबडी, मांजरी, कुत्र्यांचे प्रतिनिधित्व करीत नाही रे बाबा... तसे करू नका... अशी नक्कल केल्याने प्राण्यांना काय वाटेल' अशा शब्दांतच पवार (Ajit Pawar) यांनी बेशिस्त आमदारांना सुनावले. एकमेकांकडे पाहून आवाज काढून आणि हावभाव करून कोणाला हिणवणे आपल्याला शोभत ननसल्याकडे पवार यांनी आमदारांचे लक्ष वेधले. पवारांसोबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही टिंगलटवाळी करणाऱ्या आमदारांचे कान उपटले.
अधिवेशनात राणेंनी आदित्य यांच्याकडे पाहात 'म्याव...म्याव... केल्याचे पडसाद विधिमंडळाच्या कामकाजात उमटत आहे. आधी वाघाची डरकाळी फोडणारी शिवसेना आता मांजरीसारखीच असल्याचे राणेंनी सांगितले होते. त्यावरून राणेंच्या वागण्यावर आक्षेप घेत, त्यांना विधानसभेतून निलंबित करण्याचा आग्रह ठाकरे सरकारच्या मंत्री, आमदारांनी धरला होता. त्यावरून सत्ताधारी-विरोधकांत सोमवारी वादही झाला होता.
या पार्श्वभूमीवर विधिमंडळातील शिस्तीबाबत नियमावली ठरविण्याच्या उद्देशाने मंगळवारी सर्वपक्षीयांची बैठक झाली. मंत्री, आमदारांना शिस्तीचे धडे देण्यासाठी उपाय करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याबाबत विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सभागृहाला माहिती दिली. त्यावर विधानसभेत चर्चा झाली तेव्हा अजित पवार हे आमदार, मंत्र्यांच्या वर्तनावर सडकून बोलले.
आपण प्राण्यांचे पक्षांचे प्रतिनिधित्व करीत नाही, याचे भान ठेवलेच पाहिजे. सभागृहात आणि सभागृहाबाहेरही कोणीच चुकीचे वागू नये. मात्र, हल्ली सभागृहात कसे येतात, कुठे बसतात ? कोणी कोणाला विचारत नाहीत. त्यामुळे पदांवरील व्यक्तींचा अवमान होतो, याचेही कोणाला सोयरसुतक नसते. एकजण तर मुख्यमंत्र्यांच्या आसनावरच बसत होते, असे पवारांनी सांगितले.
अधिवेशनात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बोलण्याची नक्कल केल्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता. त्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय घरांपर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आमदारांच्या वर्तनाचा मुद्दा चर्चेत आला आहे. फडणवीसांसह आमदार सुधीर मुनगंटीवार, भास्कर जाधव यांनीही याचं समर्थन केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.