Mumbai News, 22 Jul : दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत त्यांना अभिवादन केले आहे. "यूँ बिछड़ा कि रुत ही बदल गई, एक शख़्स सारे शहर को वीरान कर गया..." या शायरीने सुरू होणाऱ्या या व्हिडिओत फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध, राजकीय प्रवासातील अनेक संस्मरणीय क्षण आणि केमिस्ट्री किती जमलेली होती हे पाहायला मिळत आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीला विधानभवनातील एक प्रसंग दाखवण्यात आला आहे. त्यामध्ये अजित पवार सभागृहात बोलताना, "मागील अडीच वर्षांत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीही झाले, उपमुख्यमंत्रीही झाले आणि विरोधी पक्षनेतेही झाले. कुठलंच पद त्यांनी रिकामं ठेवलं नाही," असे मिश्कीलपणे म्हणताना दिसतात. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकतो आणि फडणवीसही मनमोकळेपणाने हसताना दिसतात.
त्यानंतर महायुती सरकार स्थापन होण्यापूर्वीच्या एका पत्रकार परिषदेतील चर्चित प्रसंगही या व्हिडिओत समाविष्ट करण्यात आला आहे. त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र उपस्थित होते. पत्रकारांनी शपथविधीबाबत प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ शिंदे, "संध्याकाळपर्यंत माझ्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीबाबत समजेल," असे म्हणतात.
त्यावर अजित पवार तात्काळ, "त्यांचं संध्याकाळपर्यंत समजेल, पण मी मात्र शपथ घेणार आहे," असे उत्तर देतात. त्यांच्या या मिश्कील वक्तव्यामुळे पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला होता. हा व्हिडिओ त्या काळात सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. फडणवीसांनी या आठवणी पुन्हा एकदा ताज्या केल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहताना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या भावना देखील दाखवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ते म्हणतात, "अजितदादा हे खऱ्या अर्थाने माझे दादाच होते. माझा आणि त्यांचा जन्म २२ जुलैलाच झाला. ते माझ्यापेक्षा ११ वर्षांनी मोठे होते. अंतःकरणातून प्रेम करणारा मित्र म्हणून मी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांनीही माझ्याकडे तसंच पाहिलं. आमचं नातं केवळ राजकारणापुरतं मर्यादित नव्हतं, तर ते जिव्हाळ्याचं होतं."
या भावनिक व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवारांसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला असून, त्यांच्या सहवासातील अविस्मरणीय क्षण पुन्हा एकदा सर्वांसमोर आणले आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक केंद्रीय आणि राज्यातील दिग्गज नेत्यांनी त्यांना अभिवादन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अजितदादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक संदेश शेअर करत, "आजचा दिवस पूर्वी दादांचा वाढदिवस म्हणून साजरा व्हायचा. पण आज हाच दिवस 'जयंती' म्हणून साजरा करताना मन आतून पार तुटून जातंय," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.