Devendra Fadnavis, Rashmi Thackeray  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis Big Statement : 'त्या' पत्रकार परिषदेत काय बोलायचं, याची 'रिहर्सल' रश्मी ठाकरेंसमोर झाली होती...; फडणवीसांचा नवा गौप्यस्फोट

Maharashtra Politics : ''...पण मुख्यमंत्रीपद वाटलं जाणार नाही! ''

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच विदर्भ दौरा केला होता. यावेळी त्यांनी पोहरादेवीचं दर्शन घेतलं होतं. तसेच यानंतर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात २०१९ ला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांसोबत बंद दरवाजाआड झालेल्या चर्चेवर भाष्य करतानाच भाजपवर हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी पोहरादेवीचं शपथही घेतली होती. पण आता ठाकरेंच्या आरोपाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देतानाच नाव गौप्यस्फोट केला आहे.

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे गुरुवारी(दि.१३) भिवंडी येथे भाजपच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंवर सडकून टीका केली. फडणवीस म्हणाले, २०१९ ला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं पूर्ण बहुमत आलं होतं. हे मी पु्न्हा सांगतो आहे. पण अलिकडच्या काळात काही लोक शपथाही खोट्या घेत आहेत. किमान पोहरा देवीला जाऊन शपथ घेतली. पण मनात त्यांनी माफी मागितली असेल आणि निश्चितपणे देवी त्यांना माफ करेल.

एका रात्री उद्धव ठाकरेंचा फोन...

या मेळाव्यात फडणवीसांनी २०१९ च्या एका पत्रकार परिषदेविषयी नवा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, मी आज पुन्हा सांगतोय, युतीची बोलणी सुरु होती. ती सुरु असताना एका रात्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, हे सगळं जरी बरोबर असलं तरीही मी दोन दिवसांपूर्वी अमितभाईंशी बोललो होतो. मी त्यांना विनंती केली आहे की आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे अशी मागणी ठाकरेंनी केली.

...पण मुख्यमंत्रीपद वाटलं जाणार नाही!

फडणवीस म्हणाले, मी ठाकरेंना म्हटलं, मला हे सांगण्यात आलेलं नाही. तेव्हा रात्री एक वाजला होता. अमितभाईंना मी फोन केला, त्यांना सांगितलं की, उद्धवजी म्हणत आहेत तुमच्याशी त्यांचं बोलणं झालं आहे आणि ते म्हणत आहेत सीट वगैरे ठीक आहे पण मुख्यमंत्रीपद हवं आहे. मी कॉन्फिडंट नाही, तुम्ही सांगा काय करायचं. त्यावेळी अमितभाई म्हणाले, मी त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की, मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात वर्षानुवर्षे आपला फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे या संदर्भात कुठलीच तडजोड होणार नाही. काही खाती जास्त हवी ती देऊ. मंत्रिपदं जास्त देऊ पण मुख्यमंत्रीपद वाटलं जाणार नाही असंही फडणवीस म्हणाले.

...आणि सगळा संवाद संपला !

तसेच हे होत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी बोलणी थांबवा आणि नंतर काय करायचं ते बघू. ते मी उद्धवजींना सांगितलं की, मी अमितभाईंशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की, मुख्यमंत्रीपद वाटता येणार नाही. त्यावेळी मला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, हे होणार नसेल तर युती करणं कठीण आहे. ते त्यांच्या घरी गेले, मी माझ्या घरी गेलो आणि सगळा संवाद संपला.

... अन् मुख्यमंत्रीपदाचा विषय सील झाला !

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावरुन युतीची चर्चा फिस्कटल्यानंतर नेमकं काय घडलं यावर भाष्य करतानाच देवेंद्र फडणवीसांनी थेट घटनाक्रमच सांगितला, फडणवीस म्हणाले, तीन दिवसांनी एक मध्यस्थ माझ्याकडे आले, त्यावर ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंची पुन्हा चर्चेची इच्छा आहे. मी म्हटलं पुन्हा बोलायचं असेल तरीही अट तीच आहे. त्यावर ते म्हणाले की, त्यांनी आग्रह सोडला आहे. आता त्यांचं म्हणणं असं आहे की पालघरची जागा जी आपण जिंकलो होतो, ती आम्हाला हवी. पालघरची जागा दिली तर कार्यकर्ते नाराज होतील. त्यावेळी मला नेते असं म्हणाले की एखाद्या जागेसाठी युती तोडणं योग्य नाही. आम्ही बसलो, मुख्यमंत्रीपदाचा विषय सील झाला असंही फडणवीस म्हणाले.

'ते' रश्मी ठाकरेंसमोर बोलून दाखवलं!

पालघरची जागा त्यांना दिली. त्यानंतर युती झाली आणि मी पुन्हा सांगतो की ज्या बाळासाहेबांच्या खोलीविषयी ते वारंवार सांगतात त्याच खोलीत उद्धव ठाकरे, अमित शाह आणि मी होतो. काही काळ आधी ते बसले होते. मला बोलवण्यात आलं सगळ्या गोष्टी दूर झाल्या आहेत आता आम्ही दोघांनी ठरवलं आहे की, पत्रकार परिषदेत तू एकट्याने बोलायचं. आम्ही बोलणार नाही. मी मराठीत काय बोलणार आहे ते बोलून दाखवलं. हिंदीत बोलून दाखवलं. त्यानंतर रश्मी ठाकरे आल्या, त्यांच्यासमोरही बोलून दाखवलं.

अशा गोष्टी सांगायच्या नसतात पण मला सांगायची वेळ आली आहे. मी पुन्हा रश्मी ठाकरें(Rashmi Thackeray) समोर म्हणून दाखवलं आणि तंतोतंत तेच पत्रकार परिषदेत बोललो. त्यावेळी उद्धव ठाकरेंचे शब्द होते की मी खूप टोकाचं बोलून गेलो आहे, आमचं फेस सेव्हिंग झालं पाहिजे असं तुम्ही बोला. त्यामुळे मी अतिशय तोलामोलाच्या शब्दांमध्ये बोललो आणि ती पत्रकार परिषद संपली असा नवा गौप्यस्फोट फडणवीसांनी यावेळी केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT