Dhananjay Munde to Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज 25वा वर्धापन दिवस मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात साजरा झाला. तर शरद पवार गटाने हाच कार्यक्रम यंदा अहमदनगरमध्ये केला. दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी भाषणादरम्यान एक विधान केलं, जे चांगलंच चर्चेत आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे(Sunil Tatkare) यांनी यावेळी पक्षाच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, वरिष्ठ नेत्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, धनंजय मुंडे यांना उद्देशून धनंजय आता तुझ्या सर्दी पडशाचं निमित्त चालणार नाही असंही म्हटलं. त्यानंतर मग धनंजय मुंडेंनी भाषणादरम्यान अजित पवारांची शपथ घेत पक्ष कार्यसाठी महाराष्ट्र पालथा घालण्याचं जाहीरपणे आश्वासन दिलं.
धनंजय मुंडे(Dhananjay Munde) म्हणाले, 'एकीकडे आम्ही पराभव मान्य करत असताना, दुसरीकडे आपण बिनशर्त पाठिंबा देत होता. त्यावेळेस आपल्याला कुणाचे आदेश होते हे जगजाहीर झालं आहे, हे कुणाला सांगायची गरज नाही. पण एक निश्चित आहे, सांगायचा उद्देश आहे की, 2014मध्ये मी पडल्यावर सुद्धा माझ्या सारख्या तरुणावर अजितदादांनी राज्याच्या वरिष्ठ सभागृहाच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवली.'
याशिवाय 'सुनील तटकरे आपण प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहात. त्यावेळी तुम्ही प्रदेशाध्यक्ष होता. 2014 ते 2019 चांदा ते बांदापर्यंत एकदा नव्हे तर चारदा महाराष्ट्र आपण परिवर्तन आणि विविध यात्रांच्या माध्यमातून उलथापालथा केला. 2014 ते 2019 मध्ये पक्षाचं आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोबल तर आपण वाढवलंच, पण ते मनोबल वाढवत असताना आपण पुन्हा सत्तेत येऊ हा विश्वास त्या काळात आपण राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. हे मी विसरू शकत नाही.' असंही मुंडे यांनी म्हटलं.
याचबरोबर 'आज आपल्याला कदाचित माझ्या सर्दी-पडशाची आठवण झाली असेल. पण 2014 ते 2019 मध्ये न मला सर्दी होतं ना पडसं होतं. आज 25व्या वर्धापन दिनानिमित्त अजितदादांच्या पायाची शपथ घेवून सांगतो, विधासभेला नाही तर जिल्हापरिषद, पंचायत समितीला येणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिकेच्या निवडणुकीला विजय प्राप्त होत नाही, तोपर्यंत माझ्या सर्दी-पडशाचा तुम्हाला बिल्कुलही त्रास होणार नाही.
एवढच नाहीतर महाराष्ट्रातील आपल्या कुठल्याही सहकाऱ्याच्या नाकाला धार जरी लागली तरी रुमाल घेवून जाण्याची माझी तयारी आहे.' असंही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.