Mumbai News : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर राहिलेल्या दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यूवरुन पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. तिच्या वडिलांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका सादर केली आहे. त्यांनी या याचिकेत आपली मुलगी दिशानं आत्महत्या केली नसून सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. या याचिकेत आदित्य ठाकरेंचंही नाव आल्यानं राजकारण तापलं आहे. दिशा सालियन प्रकरणावर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महायुती सरकारलाच इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.20) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागपूर दंगल,अधिवेशनाचं कामकाज यांसह दिशा सालियन प्रकरणावरही रोखठोक भाष्य करतानाच महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
ते म्हणाले, आमच्या घराण्याच्या सहा-सात पिढ्या जनतेसमोर आहेत. त्यामुळे या गोष्टींमध्ये काही तथ्य नाहीये. पण राजकारण जर या वाईट दिशेला न्यायचंच असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल. दिशा सालियानच्या (Disha Salian) विषयात तथ्य नाही,दूर-दूर संबंध नाही.खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावरच बुमरँग होईल, हेच या लोकांना मी सांगू इच्छितो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.
ठाकरे म्हणाले, मागील दोन विधानसभा अधिवेशनामध्ये हे प्रकरण आलं कसं नाही. प्रत्येकवेळी अधिवेशन आलं की, हा मुद्दा काढला जातो. याचं मला नवल वाटलं होतंं. माझं म्हणणं एवढंच आहे की, शेतकऱ्यांच्या चिता पेटत आहेत, त्याला जबाबदार कोण आहे. त्यांच्या चौकशीचं काय? संतोष देशमुखांची हत्या झाली, त्यांच्या हत्येचं काय? दिशा सालियनचे मृत्यू प्रकरण न्यायालयात चालू आहे. त्यामुळे काय पुरावे आहेत ते न्यायालयात द्यावेत.जे काय आहे, ते कोर्टात द्या,असंही ठाकरेंनी सांगितले.
यावेळी उद्धव ठाकरेंनी नागपुरात झालेल्या हिंसाचारावरही आपली प्रतिक्रिया देतानाच आरएसएसच्या भूमिकेचंही कौतुक केलं. ते म्हणाले,ही दंगल घडली, त्यामध्ये ज्याने महिला पोलिसांचा विनयभंग केला, त्याचे आधी हात छाटले पाहिजे. त्यासोबतच जर कोणी दंगल भडकवली असेल तर त्याला सुद्धा कायद्याचा इंगा दाखवला पाहिजे. एकूणच काय हे सत्ताधारी आहेत, ते ढिगभर आहेत आणि विरोधी पक्ष फक्त मुठभर आहेत. मूठभर असलेला विरोधी पक्ष ढिगभर असलेल्या सत्ताधाऱ्यांना भारी पडतोय असा दावाही ठाकरेंनी यावेळी केला.
याचवेळी त्यांनी सर्वप्रथम मी आरएसएसला धन्यवाद देऊ इच्छितो. कारण त्यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा विषय ज्यांनी काढला होता, त्यांनाच त्या थडग्यात गाडलं. आपण आता राज्यात जे काही चाललंय त्यावर न बोलता जुन्या कुठल्यातरी गोष्टीवरती बोलत राहायचं त्याच्यावरून दंगली घडवायच्या, याचा आता कंटाळा आला आहे, म्हणून मी आरएसएसला धन्यवाद देत असल्याचंही म्हटलं.
आजच सर्व पक्षांचं एक शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेलं होतं. ज्या पद्धतीनं कामकाज रेटून नेलं जात आहे, हे लोकशाहीचं मूल्य पायदळी तुडवणारं आहे, असा घणाघातही ठाकरेंनी यावेळी महायुती सरकारवर केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.