
Nagpur News : नागपूरमध्ये नेमकी दंगल कशामुळे उसळली याचा शोध पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून घेतला जात आहे. भाजपच्या नेत्यांनी हिंसाचार पूर्वनियोजित होता, असा आरोप केला आहे. पोलिस आयुक्तांचे वक्तव्य नेत्यांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे अधिकच संभ्रम वाढला आहे. काही बाहेरच्या देशातून चिथावणी देण्यात आली असल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे. याचे कनेक्शन सायबर पोलिसांमार्फत शोधले जात आहे.
या सर्व घटनेची दखल राज्य अल्पसंख्याक आयोगाच्यावतीने घेण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी पोलिसांसोबत बैठक घेऊन या मागची कारणे जाणून घेऊन त्यांनी पडद्यामागचे सूत्रधार शोधण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी त्यांनी ही दंगल औरंगजेबाच्या कबरीवरून झाली नसल्याचे स्पष्ट केले.
विशेष म्हणजे औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर काही समाजकंटकांनी यास विरोध दर्शवण्यासाठी तुफान दगडफेक केली होती. त्यामुळे नागपूरमध्ये दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. तीन दिवसांपासून नागपूरमध्ये तणावाची परिस्थिती आहे. अनेक भागात कर्फ्यु लावण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे शहरात हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष निर्माण झाला आहे.
यामुळे राज्य अल्पसंख्याक आयोगाने याची दखल घेऊन गुरुवारी आढावा घेतला. औरंगजेबच्या कबरीवरून नागपूरमध्ये हिंसा झाली नाही, असे प्यारे खान यांनी सांगितले. नेमका तणाव कशामुळे झाला हे पोलिस अहवाल आल्यावर स्पष्ट होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर नेहमीच शांती आणि सौहार्दाचे प्रतिक राहिले आहे. हे शहर जात, पंथ किंवा धर्मावर आधारित वादांपासून दूर राहिले आहे. येथे दोन्ही समाज नेहमी एकत्र येत रामनवमी आणि ईद साजरी करत असतात. हीच परंपरा यापुढेही कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. हिंसाचारातील निर्दोषांना सोडावे आणि दोषींवर कडक कारवाईच्या सूचना पोलिस आयुक्तांना करण्यात आली आहे.
सर्वांनी शांतता राखवी आणि प्रशासनाला सहकार्य करावे. घटनेनंतर लगेच दोषींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील दोषींवर पोलिस कठोर करावाई करतील, पडद्यामागील लोकांवरही कारवाई होणार असून दोषींना पाठीशी घातल्या जाणार नसल्याचेही ते म्हणाले.
पोलिसांवर आरोप करू नका
पोलिस (Police) आणि सरकारवरच्या भूमिकेवर काही लोक प्रश्न उपस्थित करीत आहेत. सरकार अल्पसंख्याकांना न्याय देण्यासाठी काम करत आहेत. पोलिसांना बदनाम करू नका, पोलिस सीसीटीव्हीचे फुटेज तपासून दगडफेक करणाऱ्या व मारहाण करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. तपासात सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे. मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्याचा अल्पसंख्याक आयोग प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही प्यारे खान यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.