Amit Shah Pune Visit Sarkarnama
मुंबई

Amit Shah Pune Visit : अमित शहांच्या दौऱ्यामुळे अनेकांना काही तास राहावे लागले पोलिसांच्या नजरकैदेत !

Amit Shah Pune Tour : अमित शहा रवाना होईपर्यंत नजरेकैदेत ठेवले!

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad News : केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS) कार्यालयाच्या पोर्टल उद्घाटनासाठी केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा हे आज (ता.६) दुपारी पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. मात्र, त्यांचा हा दौरा सुरु होण्याअगोदरच शहरातील काही सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या. त्यातील काहींना त्यांच्या घरीच आज सकाळी स्थानबद्ध केले. तर, काहींना पोलीस ठाण्यावर बोलावून शहा जाईपर्यंत नजरकैदेत ठेवले.

शहा यांच्या दौऱ्याला कसलाही विरोध नसतानाही ही कारवाई केल्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी संताप व्यक्त केला.त्यांना पिंपरी पोलिसांनी सकाळी घरीच स्थानबद्ध केले.तर, आम आदमी पक्षाचे (आप) शहराध्यक्ष चेतन बेंद्रे, युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांच्यासह अनुप शर्मा, राज चाकणे, डॉ. अमर डोंगरे, वैजनाथ शिरसाठ,संतोष इंगळे, कमलेश रणवरे, सीता केंद्रे, चांद मुलानी, रशीद अत्तार, मोसिन गडकरी, कुशल काळे, स्वप्नील जवळे, सचिन पवार या पदाधिकाऱ्यांना चिंचवड, चिखली, पिंपरी, देहूरोड, निगडी, सांगवी पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले गेले. भ्रष्टाचाराविरोधात काम करणाऱ्या `आप`ला असे टार्गेट केले जाणे ही शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले.

रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेश संघटक ऋषिकेश कानवटे व प्रकाश घोडके यांनाही पोलिसांनी नजरकैद केले होते. तर, शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी विरोधी राजकीय पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनाही सीआरपीसी १४९ च्या नोटिसा बजावल्या होत्या. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांचाही त्यात समावेश होता.शहांच्या दौऱ्यात कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, निवेदन देणार नाही,काळे झेंडे दाखविणार नाही,याची दक्षता घ्यावी, असे त्याव्दारे बजावण्यात आले होते.

ही तर अघोषित आणीबाणी -

केंद्रीय गृहमंत्री,राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले,तर त्यांच्यासमोर आमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळाली पाहिजे,हा संकेत मागच्या काही वर्षांपासून पायदळी तुडविला जात असल्याबद्दल भापकर यांनी संताप व्यक्त केला.ते लोकशाहीला घातक असून ही हुकूमशाही सहन केली जाणार नाही, या नजरकैदेला घाबरणार नाही, असे ते म्हणाले.

या हिटलरशाहीचा त्यांनी निषेध केला. `आरएसएस`चे सरसंघचालक मोहन भागवत हे पिंपरीतील आरएसएस कार्यकर्त्याच्या घरी महिन्याभरापूर्वी (४ जुलै) जेवायला आले होते,तेव्हाही भापकर यांना पोलिसांनी घरी असेच त्यांना या दौऱ्याविषयी माहिती नसतानाही नजरकैद केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT