Shinde vs Thackery
Shinde vs Thackery Sarkarnama
मुंबई

Thane, Kalyan Lok Sabha Result : ठाकरे -शिंदेंच्या धुमश्चक्रीमुळे ठाण्याला पोलिसांचा वेढा!

Pankaj Rodekar

Loksabha Election 2024 Result : शिवसेना फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे गटात टोकाचे वैर निर्माण झालेले आहे. जे लोकसभा निवडणुकीतील प्रचारातून अगदी उघडपणे दिसून आले. दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून अगदी आक्रमकपणे विरोधी गटावर टीका केली गेली. तसेच, अनेक मतदारसंघातील लढत ही शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी आहे.

या ठिकाणी दोन्ही गटाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही दिसून आले. असेच चित्र शिवसेनेचा गड मानला जाणाऱ्या ठाणे आणि कल्याण मतदारसंघातही आहे. त्यामुळे आता मतदानासाठी या दोन्ही गटातील धुमश्चक्रीमुळे ठाणे, कल्याणमध्ये पोलिसांचा अतिशय तगडा बंदोबस्त तैनात आहे.

निवडणूक काळात शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा थेट सामना वारंवार पाहण्यास मिळाला. एकमेकांवर शाब्दिक आरोप प्रत्यारोप ही झाले. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे कोण बलवान ठरणार हे स्पष्ट होणार आहे. त्याचा निकाल मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीतून समोर येईल. याचदरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे शहर पोलिसांनी विशेष खबरदारी घेत, मतमोजणी केंद्रच नाहीतर उमेदवार, पक्षांचे कार्यालय तसेच विशेष चौक अशा अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारासंघात प्रत्येकी एक- एक पोलीस उपायुक्तांसह 3 सहायक पोलिस आयुक्त, अधिकारी- कर्मचारी असा 600 पोलिसांच्या मदतीने एसआरपी, सीआरपीएफ अशा प्रत्येकी एक - एक तुकडी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्यातच विजयानंतर जल्लोष करा पण संघर्ष परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन ही पोलिसांनी राजकीय पक्षांना केले आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया ठाण्यातील घोडबंदर रोडवरील न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, कावेसर, येथे सकाळी 8.00 वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. या मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण एक हजार अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 14 या प्रमाणे एकूण 84 टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 1 सुपरवायझर, 2 मतमोजणी सहाय्यक व 1 सूक्ष्म निरीक्षक (Microbserver)असणार आहेत.

तर प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी सुपरवायझर,1 पर्यवेक्षक व 1 मतमोजणी सहायक, 1 शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच स्ट्राँगरुममधून ईव्हीएम मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबलनिहाय स्वतंत्र शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. टपाली मतपत्रिकेच्या मोजणीसाठी देखील स्वतंत्र 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय, कल्याण लोकसभा मतदार संघातील मतमोजणीस डोंबिवली पूर्वेतील वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त क्रीडागृहात सकाळी 8 पासून प्रारंभ होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात प्रती विधानसभा मतदार संघात १४ याप्रमाणे एकूण ८४ टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार असून, मतदानाच्या एकूण २९ फे-या होणार आहेत. या मतमोजणी कामी एकूण ६०० अधिकारी व कर्मचारी (पोलीस स्टाफ वगळून) वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे(Shivsena) दोन्ही गट आमने सामने असल्याने संघर्षमय परिस्थिती उद्भवू शकते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे शहर पोलिसांनी विशेष खबरदारी आणि उपाययोजना करून, चोख बंदोबस्त ठिकठिकाणी लावला आहे. यामध्ये दोन्ही मतदारसंघात प्रत्येकी एक पोलीस उपायुक्त, तीन सहायक पोलीस आयुक्त, 10 पोलीस निरीक्षक, 30 पोलीस अधिकारी, 250 पोलीस कर्मचारी, प्रत्येकी एक- एक एसआरपी आणि सीआरपीए अशा तुकड्या तैनात ठेवल्या आहेत.

याशिवाय उमेदवाराचे कार्यलय, निवासस्थान, पक्ष कार्यालय, चौक आदी ठिकाणीही बंदोबस्त लावण्यात आला आहे. निकालानंतर जल्लोष करावा, पण संघर्ष परिस्थिती उद्भवू नये म्हणून नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांना सूचना कराव्या असे आवाहन पोलिसांकडून देण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT