मुंबई : शिवसेनेतील जवळपास १२ खासदारांच्या बंडानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष टोकाला गेलेला दिसत आहे. अशातच आता शिंदे गटाने थेट ठाकरे कुटुंबीयांना दणका दिला असून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे मावस बंधू आणि युवासेनेचे राज्य सचिव वरूण सरदेसाई यांची युवासेनेतून उचलबांगडी केली आहे. सरदेसाई यांच्याजागी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी किरण साळी (Kiran Sali) यांची नियुक्ती केली आहे.
किरण साळी हे मागील काही वर्षापासून शिवसेनेत कार्यरत असून आमदार आणि माजी शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी देखील युवासेनेत काम केले असून ते युवासेनेचे राज्य सहसचिव होते. त्यानंतर आता शिंदे गटासोबत दाखवलेल्या निष्ठेने त्यांना थेट वरुण सरदेसाई यांच्या जागी नेमण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांची सुरुवात देखील युवासेनेमधूनच झाली असल्याने या पदाला मोठे महत्त्व आहे.
वरुण सरदेसाई पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही अत्यंत जवळचे मानले जातात. आदित्य ठाकरे आमदार आणि राज्याचे मंत्री झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून ते युवा सेनेची जबाबदारी सांभाळत होते. २०१७ मधील कल्याण डोंबिवली, मुंबई या महापालिका निवडणुकांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिवाय ठाकरे सरकार असताना सरदेसाई यांना Y दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. आता याच सरदेसाई यांची शिंदे गटाने उचलबांगडी केली आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी काल शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीही जाहीर केली आहे. त्यामध्ये रामदास कदम (Ramdas Kadam) आणि माजी खासदार आनंदराव आडसूळ (Anandrao Aadsul) यांची नेतेपदी तर आमदार दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड केली आहे. उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड केली आहे. त्यामुळे शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाने जुनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणीही बरखास्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.