Mumbai : शिवसेना फोडून, कोर्टाच्या पायऱ्या चढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या हातातील धनुष्यबाणावर शिक्कमोर्तब केला. धनुष्यबाण घेऊन शिंदेंनी राज्यभर फिरून शिवसेना बांधणीची मोहीम उघडली आणि हजारो शिवसैनिकांना आपल्याकडे ओढवले. धनुष्यबाण हे शिंदेंना पेलणार नसल्याचे ठाकरेंनी अनेकदा बोलून दाखविले. पण ठाकरेंवर जशास तसे उत्तरे देत, शिंदेंनी धनुष्यबाणावरचा ताबा जराही सैलही होऊ दिला नाही.
बंडानंतरच्या दुसऱ्या दसऱ्या मेळाव्यातून सटासट बाण सोडून ठाकरेंना घायाळ करण्यासाठी जंग जंग पछाडलेल्या शिंदेंच्या हातातून बाणच निसटला. म्हणजे, मेळाव्याआधी शिंदेंच्या हातून रावण दहन करण्यात आले. त्यासाठी मैदानात आलेल्या शिंदेंच्या हाती धनुष्य आणि बाण दिला. त्यानंतर भल्यामोठ्या रावणाच्या दिशेने बाण सोडण्याचा शिंदेंचा प्रयत्न फसला, हातातला बाण निसटला, तो खाली पडला. तेव्हा, क्षणातच एका कार्यकर्त्यांना शिंदेंच्या हातन खाली पडलेला बाण उचलून तो पुन्हा त्यांच्या हातात दिला. पण शिंदेंकडचा बाण निसटला, ही बाब कोणाच्याच नजरेतून निसटली नसावी, हे नक्की.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसच्या साथीने सत्तेत असलेल्या ठाकरेंना सत्तातून बाहेर काढून, शिंदेंनी बंडाचे निशाण फडकावले. त्यानंतर शिवसेना ताब्यात घेण्यासाठी लढाई करून शिंदेंनी शिवसेना आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाणही मिळवेन. त्यातून ठाकरेंना जबरदस्त हादरा बसला. शिवसेना ही आपल्याकडेच असल्याचे शिंदेंनी धनुष्यबाण हातात ठेवून दाखवून दिले. त्यानंतर ठाकरेंच्या शेकडो शिवसैनिकांनी शिंदेंची साथ दिली. तरीही, कोणाच्याही हाती धनुष्यबाण शोभत नाही, तो पेलणार नाही, असे सांगत ठाकरेंनी शिंदेंवर नेहमीच हल्ले चढवले. अशाच दसऱ्या मेळाव्यासाठी ताकद लावलेल्या शिंदेंच्या हातातून खरोखरीच बाण निसटल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून खाली खेचूनही समाधान न झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या हातातला धनुष्यबाणही हिसकावला. काही केल्या धनुष्यबाण न सोडण्यावर ठाम राहिलेल्या ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या पायऱ्या चढल्या; पण शिंदेंनी बाजी मारली आणि शिवसेना, धनुष्यबाणावर आपली पकड मजबूत केली. ठाकरेंकडचे सारे काही आपल्याकडे घेतल्यानंतर शिंदेंनी गेल्या वर्षी पहिलावहिला दसरा मेळावाही भरवला. दुसरीकडे, परंपरेनुसार ठाकरेंनी शिवतीर्थावर शिवसैनिकांना एकत्र आणले. हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने ठाकरेंनी जहरी शब्दांत शिंदेंना शब्दश: फोडून काढले. त्यानंतरच्या काही मिनिटांतच खचाखच भरलेल्या 'बीकेसी’तील सभेचा ताबा घेत, ठाकरेंना बघून घेण्याची भाषा केली. या मेळाव्याने ठाकरे - शिंदेंमधील संघर्षाला धार चढली.