Ganesh Naik and Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde vs Ganesh Naik : आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवत एकनाथ शिंदेंनी काही तासांतच नाईकांचा डाव हाणून पाडला!

Navi Mumbai recruitment : महापालिकेच्या स्थगन ठरावावर राज्य सरकारचा वीजवेगाने जीआर; शिंदे विरुद्ध नाईक संघर्षाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.

Rajanand More

Recruitment controversy : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय वैर काही नवीन नाही. दोन्ही नेत्यांमधील राजकीय हेवेदावे अनेकदा प्रकर्षाने समोर आले आहेत. आता पुन्हा एकदा भाजपची सत्ता असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या भरती प्रक्रियेवरून राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील दोन बड्या नेत्यांमधील कुरघोडीचे राजकारण चव्हाट्यावर आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवत नाईकांवर नेम निशाणा साधत त्यांना एकप्रकारे झुकविण्याचा प्रयत्न केला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने सोमवारी (ता. २०) सध्या सुरू असलेली नियमित सरळसेवा भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा ठराव पारित केला होता. या ठरावाला शिंदेंकडे असलेल्या नगरविकास विभागाने काही तासांतच निलंबित केले आहे.

काय-काय घडलं?

नवी मुंबई महापालिकेच्या सोमवारीच्या सभेत सभागृह नेते सागर ज्ञानेश्वर नाईक यांनी भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्याचा स्थगन प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव बहुमताने मंजूरही झाला. सागर नाईक हे गणेश नाईक यांचे पुतणे आहेत. हा प्रस्ताव मंजूर होताच वेगाने घडामोडी घडल्या. महापालिका आयुक्तांनी तातडीने याबाबतचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठविला.

भरती प्रक्रियेची वस्तुस्थिती अत्यंत प्रगत टप्प्यावर असल्याचे नमूद करत या अहवालामध्ये परीक्षेसाठीच्या तयारीचा लेखाजोखा मांडण्यात आला होता. ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ सकतो. तसेच शासन व प्रशासनाविरुध्द न्यायालयीन प्रकरणे उद्भवू शकतात. त्यामुळे हा ठराव निलंबित करण्यासाठी शासन स्तरावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती आयुक्तांनी अहवालात केली होती.

नगरविकास खात्यानेही क्षणाचाही विलंब न करता अहवालावर लगेच कार्यवारी करत ठराव निलंबित करण्यात आल्याचा शासन निर्णय काही तासांत जारी केला. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम-४५१ (१) नुसार हा ठराव प्रथमत: निलंबित करण्यात येत असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. हा शासन निर्णय २० जुलैचा असून मंगळवारी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

सरकारने सोमवारी रात्री तातडीने जीआर काढल्यानंतर आयुक्त कार्यालयाकडून परीक्षा ठरलेल्या वेळेतच म्हणजे ता. २१ व २२ जुलै रोजी होईल, असे स्पष्ट केले. परीक्षेच्या काही तास आधी ती स्थगित करण्याचा निर्णय निलंबित करण्यात आल्याने हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी या घटनेमुळे शिंदे विरूध्द नाईक असा संघर्ष पुन्हा पाहायला मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT