Uddhav Thackeray- Raj Thackeray- Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Shivsena UBT Vs MNS : मनसे अन् ठाकरे गटाच्या राड्यात शिंदे गटाची उडी, डिवचत म्हणाले...

शर्मिला वाळुंज

Mumbai News, 11 August : मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या ताफ्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपारी फेकल्यानंतर त्याचा बदला मनसैनिकांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) ताफ्यावर शेण आणि बांगड्या फेकून घेतला. मात्र, ठाकरे गट आणि मनसेच्या या राड्यामुळे आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

दोन्हीकडील कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या ताफ्यावरील हल्ल्याचा बदला घेण्याची भाषा करत आहेत. अशातच आता ठाकरे आणि मनसेच्या वादात शिवसेना शिंदे गटानेही उडी घेत 'जसे पेराल तसे उगवते' असे म्हणत ठाकरे गटाला डिवचलं आहे.

तसंच आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चाललो आहोत, असं सांगत खरी शिवसेना (Shivsena) आमचीच असल्याचं पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गट मनसेच्या बाजूने उभं राहत ठाकरे गटावर निशाणा साधणार का हे पाहावं लागणार आहे.

आगामी विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यासाठी आपापल्या पक्षाचे दौरे यात्रा सुरु केल्या आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाडा दैऱ्यावर असताना ठाकरे गटाने त्यांच्या ताफ्यावर सुपारी फेकत आंदोलन केलं.

या घटनेमुळे संतापलेल्या मनसैनिकांनी (MNS) जशास तसं उत्तर देण्याची भूमिका घेतली आणि शनिवारी रात्री ती कृतीत आणली. त्यांनी ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण आणि बांगड्या फेकल्या आणि राज यांच्या ताफ्यावरील हल्ल्याचा बदला घेतला. अशातच आता या आंदोलनावरूनच शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना डिवचलं आहे.

डोंबिवली येथे आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यक्रमात शिवसेना शिंदे गट कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी या विषयावर भाष्य करताना 'जसे पेराल तसे उगवले जाते' असं म्हणत ठाकरे गटाला टोला लगावला आहे. तसंच कोणाची सुपारी, कोणाचा नारळ यांच्यामध्ये आम्हाला रस नाही.

सामाजिक काम करत पुढे जाणं, एवढंच बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं असून त्याप्रमाणे आम्ही कामं करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे बाळासाहेबांचं नाव घेत खरी शिवसेना आमचीच आहे, हे सांगण्याचाही त्यांनी यावेळी प्रयत्न केल्याचं दिसून आलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT