Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : ‘जय गुजरात’चा वाद शिंदेंच्या चांगलाच जिव्हारी; लांबलचक पोस्टमधून महाराष्ट्राला केलं सावध...

Eknath Shinde Reacts to the 'Jai Gujarat' Controversy : शिवसेनेच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर भलीमोठी पोस्ट करत वादाला प्रत्युतर दिले आहे. तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावरही थेट निशाणा साधला आहे.

Rajanand More

Opposition Targets Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पुण्यातील एका कार्यक्रमात जय महाराष्ट्रपाठोपाठ जय गुजरातचा नारा दिला. त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेतील नेत्यांनी शिंदेंची पाठराखण केली आहे. पण हा वाद शिंदेंच्या चांगलाच जिव्हारी लागला असून त्यांनी याबाबत सविस्तर आपली भूमिका मांडली आहे.

शिवसेनेच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर भलीमोठी पोस्ट करत वादाला प्रत्युतर दिले आहे. तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावरही थेट निशाणा साधला आहे. गुजरात पाकिस्तान आहे का?, या प्रश्नाने पोस्टची सुरूवात करण्यात आली आहे. सप्रेम जय महाराष्ट्र म्हणत या पोस्टमध्ये गुजरातचे समर्थन करण्यात आले आहे.

शिवसेनेची एक्सवरील पोस्ट आहे तशी...

पुण्यातील गुजराती बांधवांच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ या घोषणेपाठोपाठ ‘जय गुजरात’ असेही म्हणालो. त्या मुद्द्यावर बरीच कोल्हेकुई चालू आहे. अस्तित्वातच नसलेल्या मुद्द्यावर गुद्दे मारण्याचा हा उद्योग आहे.

‘जय गुजरात’ ही घोषणा नसून पुण्याच्या उत्साही, सकारात्मक आणि उद्यमशील गुजराती बांधवांच्या कर्तृत्वाला दिलेली दाद होती. त्याकडे तशाच नजरेने पाहायला हवे. गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे, हे विरोधकांनी आधी लक्षात घ्यावे. ‘जय गुजरात’ म्हटल्यानंतर ज्यांना एवढा राग येतो, त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले तेव्हा त्यांचा राग कुठे गेला होता?

आज या मुद्यावरून जे टीका करत आहेत, त्यांच्या नेत्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा यापूर्वी दिलेली आहे. निवडणुकांच्या तोंडावर ‘केम छो वरळी’ ही होर्डिंग्ज लावणारे कोण होते? ‘जलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी प्रसिद्धिपत्रके पक्षाच्या अधिकृत सोशल मीडियावरून प्रसिद्ध करणारे कोण होते? त्यांनी गुजराती समाजाची मते मिळवण्यासाठी हे सगळे उद्योग केले. परंतु, आम्ही गुजरातला जन्मभूमी आणि महाराष्ट्राला कर्मभूमी मानून राज्याच्या विकासात योगदान देणाऱ्या गुजराती बांधवांची प्रशंसा केली. त्यात कुठलेही राजकारण नव्हते.

गुजराती बांधवांचे कौतुक करणाऱ्यालाही विरोध करणाऱ्या, या विघ्नसंतोषी आणि स्वार्थी राजकारणाचा धिक्कार करावा तितका थोडाच आहे. थोडा तरी उमदेपणा कुणाकडून तरी उसना घ्यावा, असा आमचा विरोधकांना सल्ला आहे. पण जिथे-तिथे राजकारण कालवण्यात धन्यता मानणाऱ्या विरोधकांना कोण समजावणार? त्यांच्याकडे कोणतेही ठोस मुद्दे उरले नाहीत, कार्यकर्ते नाहीत, पक्षही संपत चालल्यामुळे पराचा कावळा करण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही गुजराती बांधवांचा द्वेष केला नाही की त्यांना आपले शत्रू मानले नाही. जो देशाशी किंवा महाराष्ट्राशी द्रोह करतो, तो शिवसेनेचा शत्रू. मग तो कोणत्याही प्रांताचा, धर्माचा किंवा जातीचा असो. पुण्यातील गुजराती समाजाने व्यापारात योगदान दिले आहे. तेथे कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले गुजरात भवन, जयराज क्रीडा संकुल हे पुण्याच्याच लौकिकात भर घालणारे आहेत. पुण्यातच कशाला, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गुजराती समाज पसरला आहे आणि आपल्या स्वभावधर्माला जागून त्यांनी व्यापारधर्म वाढवून राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावला, हे वास्तव आहे.

हिंदुत्व आमचा प्राण आहे आणि मराठी आमचा श्वास आहे, हे मी वारंवार सांगितले आहे. आमची नाळ ही मराठी माणसाशी जोडलेली आहे. ती कुणी कितीही प्रयत्न केला तरी ती तुटणार नाही. आम्ही स्वकर्तृत्वावर निवडणूका जिंकू शकतो. त्यासाठी अशा मुद्यांचं राजकारण करण्याची गरज आम्हाला नाही.

गुजरात हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे. मतांच्या ध्रुवीकरणासाठी गुजराती बांधवांना दुय्यम नागरिक ठरवण्याचे विष सध्या कालवले जात आहे. त्यापासून सर्वांनीच सावध राहिले पाहिजे. यामुळे महाराष्ट्राचीच प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर मलिन होते, याचे भान विरोधकांनी ठेवायला हवे.

जय हिंद, जय महाराष्ट्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT