Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पत्ता कट झाला, तर एकनाथ शिंदेंसमोर 'हे' 3 ऑप्शन असणार

Eknath Shinde's future options if not Maharashtra CM again: दिल्लीतून महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले असून एकनाथ शिंदेंचा पत्ता कट झाल्यात जमा असल्याचेही बोलले जात आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं ऐतिहासिक विजय मिळवत 230 जागांचा टप्पा गाठला.महायुतीच्या या त्सुनामीसमोर विरोधक भुईसपाट झाले.पण या अभूतपूर्व यशानंतर ज्याची भीती होती तेच महायुतीत घडत असल्याची चर्चा कानावर पडू लागली आहे. मुख्यमंत्री पदाबाबत भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात जोरदार रस्सीखेंच सुरू असल्याने अंतिम निर्णय घेण्यास विलंब होत असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रात महायुती (Mahayuti) सरकारनं पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरुन यश मिळालं आहे.भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या आहेत.तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 जागा मिळाल्या आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. पण एवढं स्पष्ट बहुमत येऊनही महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला आहे.

दिल्लीतून महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले असून एकनाथ शिंदेंचा पत्ता कट झाल्यात जमा असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्री पदी वर्णी लागली नाही तर एकनाथ शिंदेंसाठी आणखी तीन पर्याय उपलब्ध असू शकतात.

पहिला ऑप्शन

मध्य प्रदेशचा फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरला गेला तर शिवराज सिंह चौहान यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांची मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागू शकते.त्यांना केंद्रात मोठं खात्याची ऑफर दिली जाऊ शकते. शिंदेंसाठी हा पर्याय फायदेशीर ठरु शकतो असंही राजकीय जाणकारांचं मत आहे. कारण् महाराष्ट्रात आपल्या कार्याचा ठसा उमटल्यावनंतर त्यांना राष्ट्रीय राजकारणात चमकण्याची संधी मिळू शकते.

दुसरा ऑप्शन

एकनाथ शिंदेंना जर महाराष्ट्राच्या राजकारणातच सक्रिय राहायचं असेल तर त्यांच्यापुढे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणं हा दुसरा पर्याय आहे.देवेंद्र फडणवीसांच्या पावलावर पाऊल ठेवून ते त्यांच्यासारखं काम उपमुख्यमंत्रिपदाच्या काळात करू शकतात.त्यांच्याकडे महत्त्वाच्या खात्यांचा कारभार दिला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

तिसरा ऑप्शन

समजा हे दोन्हीही ऑप्शन नाकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासमोर तिसरा पण अत्यंत टोकाचा पर्याय उपलब्ध असेल तो म्हणजे महायुतीतून बाहेर पडण्याचा. मात्र, ते असा धोकादायक निर्णय घेतील याची शक्यता फार कमी आहे.कारण शिंदेंनी सुरुवातीपासून महायुतीसाठी पोषक भूमिकाच घेतली आहे.

तसेच दिल्लीतील भाजप नेत्यांशी त्यांचे संबंधही तितकेच जवळचे आहेत.त्यामुळे महायुतीतून बाहेर पडण्याचा ऑप्शन ते कदापि स्विकारणार नाहीत. त्यामुळे वरील दोन पर्यायांपैकी एक निवडण्याची वेळ त्यांच्यावर असणार आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करतानाच त्यांना केंद्रातील मंत्रि‍पदाचा पर्याय सुचवला होता. ते म्हणालेले, महायुती सरकारच्या अडीच कालावधीत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी नक्कीच चांगलं काम केलं.त्यांच्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. महायुतीच्या महाविजयात एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा आहे, असंही आठवले यांनी म्हणाले होते.

पुढच्या 2-3 दिवसांत मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होईल.जास्त जागा असल्याने भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी भूमिकाही आठवलेंनी मांडली.मात्र, बिहार पॅटर्न महाराष्ट्रात लागू होणार नसल्याचं स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,बिहारमध्ये आधीच नितीश कुमार यांना शब्द दिला होता. त्यामुळं त्यांना मुख्यमंत्री केलं. पण एकनाथ शिंदे यांना असा काही शब्द दिला असेल, असं मला वाटत नाही. त्यामुळं मुख्यमंत्री भाजपचाच होईल असं ठाम मतही आठवले यांनी व्यक्त केलं.

एकनाथ शिंदेंच्या काय आहेत जमेच्या बाजू

नम्र, मितभाषी, कडवट शिवसैनिक, जोडतोडीच्या राजकारणाचं कौशल्य, मराठा चेहरा या मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असलेल्या एकनाथ शिंदेंच्या जमेच्या बाजू आहेत. तसेच अडीच वर्षांत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी थेट संपर्क, लाडकी बहीण यांसह अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा आणि तितकीच तत्परतेनं त्यांची अंमलबजावणी यासाठी शिंदेंची ओळख झाली आहे.

तसेच राजकीय नेतेमंडळी,आमदारांसह सर्वसामान्य नागरिकांनाही उपलब्ध होणारा मुख्यमंत्री,जनसामान्यांच्या प्रश्न सोडवण्यावर भर,दिवसरात्र झोकून देत झपाट्यानं काम करण्याची शैली,पक्षांसह आमदारांनर कमांड,तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता,मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक गरजवंतांना आर्थिक मदत, ठाणे,मुंबई,कोकणसह राज्यातील सर्व भागांत दबदबा, असे अनेक प्लस पॉइंट शिंदेंना मुख्यमंंत्रिपदाच्या शर्यतीत फायदेशीर ठरू शकतात.

शिदेंचा नवा प्रस्ताव

पुन्हा मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता कमी असताना आता एकनाथ शिंदे यांनी एक नवा प्रस्ताव भाजप पक्षश्रेष्ठींसमोर ठेवल्याची चर्चा आहे. राज्याचं मुख्यमंत्रीपद देणार नसेल तर आपल्याला महायुती सरकारचा संयोजक हे पद देण्यात यावं, कारण राज्यातील विधानसभा निवडणूक ही आपल्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात आली होती, असं शिंदे यांचं मत आहे. याचसोबत खासदार श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद दिलं जावं, अशीही मागणी त्यांनी या प्रस्तावाद्वारे भाजपकडे केल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांच्या या नव्या प्रस्तावामुळे भाजप आणि महायुतीचे नेत्यांची डोकेदुखी आणखी वाढल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT