Ravindra Chavhan, Shrikant Shinde, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Vs Ravindra Chavan : भर व्यासपीठावर शिंदेसोबत काल काय ठरलं? आज रविंद्र चव्हाणांकडून थेट एका पक्षप्रवेशालाच स्थगिती

BJP stalls entry of Shiv Sena leader : भाजप आणि शिवसेनेतील दरी वाढत असल्याची चर्चा सुरू असतानाच शनिवारी पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण डोंबिवलीमध्ये एकाच व्यासपीठावर आले.

Rajanand More

Maharashtra politics update : नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खासकरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा त्यामध्ये पुढाकार असल्याचे सांगितले जाते. प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघातील पक्षप्रवेशांनी राजकीय वादळ उठले. शिंदेंनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेत त्यांच्याही कानावर ही बाब घातल्याची चर्चा होती.

निवडणुका पार पडल्यानंतरही पक्षप्रवेश थांबले नाहीत. डोंबिवलीतील शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ यांनी रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी कल्याण ग्रामीणचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांनाही भाजपने आपल्याकडे खेचले. या पक्षप्रवेशाने पुन्हा भाजप विरूध्द शिवसेना वाद चव्हाच्यावर आला होता.

एकीकडे भाजप आणि शिवसेनेतील दरी वाढत असल्याची चर्चा सुरू असतानाच शनिवारी पहिल्यांदाच शिंदे आणि चव्हाण डोंबिवलीमध्ये एकाच व्यासपीठावर आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिंदे यांच्याशेजारी मंत्री उदय सामंत यांची खुर्ची आणि त्यांच्याशेजारी रविंद्र चव्हाणांची खुर्ची होती. पण काहीवेळाने उदय सामंत आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी चव्हाणांना आपली जागा दिली.

जागांची अदलाबदली झाल्यानंतर शिंदे आणि चव्हाणांमध्ये बराचवेळा गप्पांचा फड रंगला होता. अधूनमधून उदय सामंतही त्यात सहभागी होत होते. या तिघांमध्ये नेमक्या काय चर्चा झाल्या, हे समोर आले नाही. मात्र, या कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी डोंबिवलीमधील अभिजित थरवळ यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या पक्षप्रवेशास स्थगिती देण्यात आली आहे.

खुद्द रविंद्र चव्हाण यांनीच सोशल मीडियातून याची माहिती दिली आहे. या पक्षप्रवेशाला तुर्तास स्थगिती देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिंदे आणि चव्हाणांच्या भेटीनंतर झालेल्या या स्थगितीला महत्व प्राप्त झाले आहे. अभिजित थरवळ हे मागील १५ वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून युवा सेनेचे पदाधिकारीही होते. त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूकही लढवली होती. भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी पुन्हा दंड थोपटले होते. पण अचानक त्यांच्या प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT