Mahayuti Conflict : महायुतीतील खदखद बाहेर आली; फुटलेला हा बांध काय-काय वाहून नेणार?

Maharashtra politics : भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) वाढता मतभेद स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये प्रकर्षाने दिसला. अमित शहांच्या विधानानंतर महायुतीत तणाव वाढला असून पक्षांतर्गत कुरघोडीमुळे युतीची एकता प्रश्नांकित झाली आहे.
Devendra Fadanvis & Eknath shinde
Devendra Fadanvis & Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Local Body Elections : महाराष्ट्रात भाजपला कुबड्यांची गरज नसल्याचे आणि 2029 मध्ये राज्यात स्वबळावर सत्ता येणार असल्याचे भाकित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत केले होते. त्यांचे हे विधान महायुतीमध्ये विशेषत: एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षासाठी हा गर्भित इशारा समजला जात आहे. त्याचाच परिणाम म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्तेत असलेल्या महायुतीतील या दोन प्रमुख पक्षांमध्ये एकमेकांविरुद्ध सुरु असलेली कुरघोडी. संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार हा महायुतीच्या भोवतीच सीमित होता. त्यातदेखील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने अधिक लक्ष केंद्रीत केले होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माजी दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या भाषणाचा संदर्भ देत, एक हा नंबर एकच असतो, नंबर दोनला काही किंमत नसते’ असा थेट टोला त्यांनी शिंदेंचे नाव न घेता मारला आहे. महायुतीतली खदखद यानिमित्ताने बाहेर आली असून यापुढच्या काळात हा फुटलेला हा बांध काय काय वाहून नेईल हे काळच ठरवेल.

बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने पुन्हा सत्ताप्राप्त केली आणि भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार केंद्रातही मजबूत झाले. त्यामुळे एनडीएमध्ये सात खासदार असलेला तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही भाजपकडून आपण ‘साईड ट्रॅक’ केले जाण्याची भिती शिवसेना शिंदे पक्षाला भेडसावू लागली आहे. शिंदेची शिवसेना निवडणुकीच्या या निकालानंतर हवालदिल झाली आहे.

सत्ताधारी भाजप व शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही घटक पक्षांदरम्यान सर्व काही आलबेल चाललेले नाही. शहा यांनी ‘कुबड्या’ म्हणून मित्रपक्षांना बाजूला सारण्याचा इशारा देणे, 2029 मध्ये स्वबळावर सत्तेत येण्याचे भाकित करणे हे इशारे शिंदेंच्या शिवसेनेला अस्थिर करण्यास पुरेसे आहेत. त्याचाच प्रत्यय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आला. या निवडणुकांसाठी युती करण्यापासून एकमेकांचे कार्यकर्ते ओढण्यावरुन ही ठिणगी पडली.

महायुतीमध्ये असूनही भाजपने शिंदे गटातील अनेक नेते, पदाधिकारी आणि नगरसेवक आपल्या पक्षात प्रवेश करून घेतले. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, उल्हासनगर, जळगाव आणि पुणे येथे शिंदे गटातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना घेरण्यासाठी भाजपने आक्रमक पावले उचलली. याची नाराजी दर्शवण्यासाठी शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिले होते. अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, त्यावर तुम्हीच आधी फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात केली’ असे सुनावत वाद टाळण्यासाठी एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश देऊ नये असा तोडगा काढला.

Devendra Fadanvis & Eknath shinde
Kalyan-Dombivli Mahapalika : शिंदे पिता-पुत्राला बालेकिल्ल्यातच धक्का : आरक्षणानंतर समीकरणे बदलली; भाजपला सर्वाधिक राजकीय लाभ?

प्रत्यक्षात मात्र त्यानंतरही दोन्ही पक्षांकडून कार्यकर्त्यांची खेचाखेची सुरुच राहिली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेना शिंदे पक्षाला भाजपने आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. शिवाय मुंबई सोबतच या पुढच्या काळात ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, अंबरनाथ, नवी मुंबई व भिवंडी- निझामपूर या सहा महापालिकांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात विविध प्रकल्प येणार आहेत. या महापालिकांकडे नवीन ‘ग्रोथ हब’ म्हणून पाहिले जात आहे.

या महापालिकांमधून शिवसेना शिंदे पक्षाला कसे दूर ठेवता येईल यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासमोर तर एकनाथ शिंदे हे एकच मिशन असल्यासारखे ते त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाय त्यांच्या जोडीला भाजपचे मंत्री वनमंत्री गणेश नाईक देखील आहेतच. जे शिवसेनेच्या काळापासून एकनाथ शिंदे यांचे स्पर्धक मानले जातात, त्यांनी देखील ठाणे जिल्ह्यात शिंदेंना आव्हान देण्यात कोणतीच कसर ठेवलेली नाही.

शिंदेंसाठी ‘इकडे आड, तिकडे विहिर’

शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश देण्यापर्यंतच ते थांबलेले नाहीत, तर शिंदेंना थेट ललकारण्याचा प्रयत्नही चव्हाणांकडून सुरु आहे. नंबर १ चा पाढा वाचणं हा त्याचाच भाग आहे. एमएमआर महापालिकांमधून शिंदे सेनेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न एकाबाजूने सुरु असताना राज्यात इतरत्र मात्र शिवसेना-शिंदे पक्षाला भाजपचा पदर पकडून ठेवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. एकूणच शिवसेना-शिंदे पक्षाची ‘इकडे आड, तिकडे विहिर’ अशी अवस्था झालेली दिसते.

Devendra Fadanvis & Eknath shinde
Mahayuti Conflict : अखेर महायुतीतील मोठ्या वादावर तोडगा निघाला : भाजपची शिवसेना, राष्ट्रवादीसोबत डील ठरली

याही परिस्थितीत डहाणू नगर परिषदेच्या प्रचारात शिंदे यांनी, एकाधिकारशाही, गुंडशाही, दडपशाही आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक झाली होती. कोणा एका पक्षाविरुद्ध नाही तर, एका अहंकारी व्यक्तीविरुद्ध आपण एकवटले असल्याचे ललकारले होते. हा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच असल्याचे स्पष्ट होते. मात्र सभा संपल्यानंतर काही वेळेतच हा इशारा महाविकास आघाडीतील विरोधकांना असल्याची सारवासारव करण्याची वेळ शिंदेंवर आली.

कार्यकर्त्यांची पळवापळवी आणि शाब्दिक इशाऱ्यांवरच हे थांबलेले नाही तर शिवसेना शिंदे पक्षाचे आ. निलेश राणे यांनी मालवणमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरात पोलिसांसह धाड टाकून बेहिशेबी रक्कम पकडून दिली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यापुढे जावून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी हा पैसा दिला आहे. अशाप्रकारे मतदारसंघात दरदिवशी 25 ते 50 लाख रुपयांची रोकड येत असल्याचे आरोप त्यांनी केले. महायुतीमध्ये एकत्रित सत्तेत असतानाही आ. निलेश राणे यांचे हे कृत्य धाडसाचेच म्हणावे लागेल. त्या मोबदल्यात घरात विनापरवानगी घुसल्याच्या तक्रारीस्तव त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकल्याचा दावा केला जात आहे. मात्र पोलिसांनी आ. बांगर यांच्या घराची तपासणी केल्याचा आरोप फेटाळला आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे सांगोल्याचे आ. शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने धाड टाकत तपासणी केली. या धाडसत्रांमुळे महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण झाले असल्याच्या शक्यतेला आधार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेल्या या बेबनावासह हिवाळी अधिवेशनाला महायुती सामोरी जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संवाद, दोघांचे आपापसातील वर्तनासह शह काटशहामुळे या अधिवेशनात विरोधकांपेक्षा सत्ताधारीच रंग भरण्याची लक्षणे आताच दिसू लागली आहेत.

राज्यात नगरपरिषदा आणि नगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने राज्यात निवडणुकीत ज्वर चढला आहे. मात्र अद्याप मुंबईपर्यंत या निवडणुकीचे वारे पोहोचलेले नाही. विशेषत: सर्व राजकीय पक्षांचे नेते राज्याच्या या निवडणुकांच्या प्रचाराच व्यग्र असताना शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी मात्र मुंबई सोडलेली नाही. शिवसेना ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीच त्यांच्या पातळीवर या निवडणुका लढवल्या. विरोधकांनी त्यावरुन ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या दबावाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. उद्धव ठाकरेंनी त्यांचे संपूर्ण लक्ष आगामी मुंबई महानगरपालिकांमध्ये घातले आहे. त्यासाठी त्यांची आखणी सुरु आहे.

शिवसेना ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुंबईसह ठाणे, कल्याण - डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक या महापालिकांमध्ये युती होण्याची दाट शक्यता आहे. या महापालिकांमध्ये जागा वाटप कसे असावे याबाबतचा ‘फॉर्म्युला’ ठरविण्यासाठी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरु आहे. मात्र महापालिका निवडणुका जाहीर होईपर्यंत युतीची अधिकृत घोषणा शिवसेना ठाकरे आणि मनसे या नवयुतीकडून केली जाण्याची धुसर शक्यता आहे.

Devendra Fadanvis & Eknath shinde
Mumbai Municipal Election : मुंबई महापालिका निवडणुकीवेळी 70 हजार कर्मचाऱ्यांची फौज; बूथ संख्येत 10 टक्क्यांनी वाढ

मुंबई महापालिका निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सामोरे जावे यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नात आहेत. शिवसेना ठाकरे पक्षासोबत युती होत असल्याने काँग्रेसने देखील मनसेचा स्वीकार करावा असा आग्रह उद्धव ठाकरेंनी लावून धरला होता. त्यांच्या या मागणीला काँग्रेसने हिंग लावले नाही. मनसेची परप्रांतीय आणि मुस्लिम समुदायाविषयीची भूमिका काँग्रेसच्या विचारधारेच्या विरुद्ध जाणार असल्याने त्यांच्यापासून दूरच राहण्याचा निर्णय मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड यांनी घेतला.

महाविकास आघाडीमध्ये मनसेचा समावेश करावा यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार देखील सकारात्मक असल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष महापालिका निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करणार की शिवसेना ठाकरे, मनसेच्या युतीमध्ये स्वत:ला सामावून घेणार हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मुंबईत अल्प ताकद असल्याने त्यांचा फार फायदा किंवा तोटा होण्याची शक्यता नाही.

ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मोठी आव्हाने

या सर्व युती आघाडीच्या जमवाजमव करण्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला एका वेगळ्याच आव्हानाचा सामना करावा लागत आहे. शिवसेना म्हणजे शिवसैनिकांचे जाळं असणारा पक्ष. अत्यंत सामान्य कार्यकर्त्यालाही आमदार - खासदार बनवण्याची हुकूमी बळ त्यांच्याकडे होते. मात्र आज त्याच पक्षाचे जमिनीवरचे जाळे पार विस्कटून गेले आहे. महापालिका निवडणुकीसाठी दमदार उमेदवारांची चणचण त्यांना भासू लागली आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेले 60 पेक्षा जास्त नगरसेवक आणि त्यापुर्वीचे माजी नगरसेवक असे जवळपास 130 च्या आसपास नगरसेवक शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने गळाला लावले आहेत.

त्यामुळे शिवसेनेच्या शाखा विस्कळीत झाल्या आहेत. मोठ्या विश्वासाने उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा हात हातात घेतला असला तरी संघटनेच्या पातळीवर त्यांची अवस्था त्यापेक्षाही दुबळी आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या यापेक्षाही भाजपला आव्हान देवू शकतील असे दमदार निवडणुकीत उभे करणे आणि शिवसेनेच्या (Shivsena) शाखांची फेरबांधणी करणे हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com