Eknath Shinde Vs Tejashwi Yadav Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Vs Tejashwi Yadav : 'चारा घोटाळा' काढत एकनाथ शिंदेंचा बिहारीबाबूंना टोला, म्हणाले 'होय, आम्ही डीलर, कारण...'

Mayur Ratnaparkhe

Mumbai News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेचा रविवारी मुंबईतील शिवतीर्थावर इंडिया आघाडीच्या भव्य सभेतून समारोप झाला. या प्रसंगी देशभरातील विरोधी पक्षांचे नेते एकाच मंचावर आले होते. या सर्वांकडून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका झाली.

तर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही भाषणातून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्र सरकार हे डीलर पार्टी असल्याचं त्यांनी म्हटलं. ज्यावर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

बिहारी बाबू तेजस्वी यादव(Tejashwi Yadav) यांच्या आरोपांवर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'होय, आम्ही खरंच डीलर आहोत. कारण आम्ही डील केली ती शेतकऱ्यांच्या हितासाठी, माय भगिनींना न्याय देण्यासाठी, तरुणांना रोजगार देण्यासाठी, कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि ज्येष्ठांना न्याय देणयासाठी आम्ही यासाठी डील केली.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच, 'त्यांनी आतापर्यंत केलेल्या डीलमध्ये कुठले कुठले मोठे घोटाळे झाले. 2014 पूर्वी तेव्हा त्यामध्ये कोण होतं? रोज वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने यायचे. चारा घोटाळा, कोळसा घोटाळा किती घोटाळे समोर आले. आता मोदींच्या काळात एकतरी घोटाळा दाखवा. त्यांच्यावर एक साधा डागही त्यांना लावता आलेला नाही. त्यांच्याकडे आरोप करायला काही नाही. म्हणून हे खोटे आरोप करतात आणि ज्याज्यावेळी 2014ला खोटे आरोप केले. त्यांचं पानिपत झालं.

2019ला आरोप केले, त्यांचं पानिपत झालं. 2024ला आता आरोप करत आहेत, त्यांना विरोधी पक्षनेता बनण्याइतके तरी खासदार मिळतील की नाही, माहीत नाही,' असंही एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी बोलून दाखवलं.

तेजस्वी यादव नेमकं काय म्हणाले? -

तेजस्वी यादावांनी केंद्र सरकारसह राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका करताना म्हटले होते की, महाराष्ट्रात भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीतून आमदारांचा घोडेबाजार केला. त्यातून राज्यात सत्तांतर केले. या सरकारमध्ये कुणीही लीडर नसून सर्व डीलर आहेत. शरद पवारांच्या नावाने मतं मागायचे आणि भाजपशी डीलिंग करायची, उद्धव ठाकरेंच्या नावाने मते मागितली आणि भाजपशी डीलिंग केली, राहुल गांधींच्या नावाने मते मागितली आणि भाजपशी डीलिंग केली. या लोकांनी फक्त डीलिंग केले,' अशी टीका यादवांनी केली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT