Eknath Shinde Mumbai politics : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दसरा मेळाव्याला मुंबईतील आझाद मैदान साथ देताना दिसेनासे झाले आहे. सततच्या पावसामुळे मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने तिथं मंडप उभारताना देखील अडचणी येत आहे.
यावर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. परंतु गोरेगाव इथल्या नेस्को मैदानावर अगदी साध्यापद्धतीने यंदाचा दसरा मेळावा होईल, असे शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा मुळात आझाद मैदानावर होणार होता. यासाठी भव्य मंच उभारला गेला होता, तसंच जवळपास एक लाख खुर्च्यांची ऑर्डर देण्यात आली होती; मात्र सततच्या पावसामुळे आझाद मैदानावर चिखल साचलेला आहे. कार्पेट अंथरून त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न झाला; पण चिखलामुळे कार्पेटही खराब झाले. पाणी काढण्यासाठी पंप लावण्यात आले, तरी त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे अखेर पर्यायी जागा म्हणून गोरेगावचे नेस्को सेंटर निवडण्यात आले.
राज्यात पूरस्थिती आहे. अतिवृ्ष्टीचा फटका शेतकऱ्यांना (Farmer) बसला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा अगदी साध्यापद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षीचा दसरा मेळावा गोरेगाव इथल्या नेस्को मैदानावर होणार आहे. यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि एमएमआर परिसरातील शिवसैनिकांना आमंत्रण दिले गेले आहे; मात्र पूरग्रस्त भागातील कार्यकर्त्यांनी मेळाव्यास न येता शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी, शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा यंदा होणार असला, तरी त्याचे स्वरूप साधेपणाचे ठेवण्यात आले आहे. ‘आम्हाला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही; लोकांनीच आम्हाला विजयी केले आहे. आता आमची ताकद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरणार आहोत,’ अशी भूमिका घेतली आहे.
'राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. जमीन वाहून गेली, पशुधनाचे नुकसान झाले, जीवितहानी झाली आणि काही ठिकाणी घरेही पाण्याखाली आहेत. या शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हीच सरकारची खरी जबाबदारी आहे. परंतु विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्या भागातील शिवसैनिकांनी मुंबईत न येता थेट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसवावे,’ असा आदेश एकनाथ शिंदेंनी शिवसैनिकांना काढला आहे. शिवसेना पूरग्रस्त शेतकऱ्यांना 26 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटत आहे. शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.