Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Aditya Thackeray Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे 'मातोश्री'वर येऊन रडायचे; आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं

Sunil Balasaheb Dhumal

Thane Political News : भाजपचा खोटे बोला, पण रेटून बोला असा स्वभाव आहे. आता खोटे बोला पण रडून बोला, अशी नवीन फॅशन आली आहे, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे युवाप्रमुख आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली.

मुख्यमंत्री शिंदे यांची ही रडारड नवीन नाही. काही झाले की अश्रू गाळायचे आणि हवे ते मिळवायचे, ही त्यांची जुनीच सवय आहे. कोल्हापूरच्या सभेतही मुख्यमंत्र्यांनी रडत आपण पती, मुलगा, पिता म्हणून अपयशी ठरलो असे सांगितले. पण तुम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही अपयशी मानतो. पुढे जाऊन तुम्ही घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणूनही अपयशी ठराल, असा घाणाघात आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूर येथे शिवसेना शिंदे गटाचे महाअधिवेशन झाले. या वेळी मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) उद्धव ठाकरेंवर अनेक आरोप केले. त्या प्रत्येक आरोपांची आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जाऊन परतफेड केली. जमलेली गर्दी पाहून गद्दार गेले असले तरी ठाणे ही अजूनही शिवसेनेचीच आहे, यावर खात्री पटते असा दावाही ठाकरेंनी केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, आधी भाजप (BJP) खोटे बोला पण रेटून बोलत होती. आता शिंदे गट खोटे बोला, पण रडून बोला. ही राज्यात नवीन फॅशन आली आहे. त्यासाठीच कोल्हापूरचे अधिवेशन होते. वास्तविक शिंदे यांना रडत पाहण्याची आपल्याला सवय आहे. ज्या पक्षाने, कुटुंबाने, व्यक्तीने तुम्हाला सर्वकाही दिले, त्याच व्यक्तीचा बाप, पक्ष, चिन्ह तुम्ही चोरला. पण दोन गोष्टी कधीच पुसल्या जाणार नाहीत, एक म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेले काम आणि तुमच्या माथ्यावर असलेला गद्दारीचा डाग, अशी टीकाही ठाकरेंनी केली.

कल्याण (Kalyan) विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या राजीनामा नाट्याची नक्कल त्यांनी या वेळी करून दाखवली. या वेळी त्यांनी उल्हासनगर, ठाणे, कल्याणमध्ये निवडणुकांत शिंदे कसे रडायचे व हवे ते मिळवायचे हे सांगितले. इतकेच नव्हेतर मे २०२२ मध्येही असे ते मातोश्रीवर रडले. आपल्यामागे ईडी लागली आहे. भाजपसोबत युती करा, अशी विनवणी त्यांनी केली होती. आता मुख्यमंत्री होऊनही त्यांची रडण्याची सवय काही गेली नाही, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.

ही निवडणूक देशाच्या संरक्षणासाठी

2022 मध्ये भाजपने शिवसेना तोडली. 2023 मध्ये राष्ट्रवादी फोडली. 2024 मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण महाराष्ट्राला गाजराशिवाय काही मिळाले नाही. कारण या सरकारवर कुणीही विश्वास ठेवत नाही. आतापर्यंतच्या सर्व्हेमध्येही आपणच पहिल्या क्रमांकावर आहोत. म्हणून हे ठाणे, मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुका घेत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. तुमच्यात हिंमत असेल तर आमदारकी, मुख्यमंत्रिपदाचा राजिनामा द्या. तुमच्याच मतदारसंघातून मी उभा राहतो, असे पुन्हा आव्हानही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT