Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : एकनाथ शिंदे CM पदाचा राजीनामा देणार? कार्यकर्त्यांना केलं आवाहन; म्हणाले, समृद्ध महाराष्ट्रासाठी...

Eknath Shinde's message to workers: विधानसभेच्या निकालानंतर आता राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एकीकडे विद्यमान मुख्यमंत्री हेच पुढे मुख्यमंत्री रहावेत अशी इच्छा शिवसेनेच्या नेत्यांची आहे. तर भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 26 Nov : विधानसभेच्या निकालानंतर आता राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एकीकडे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पुढे मुख्यमंत्री रहावेत अशी इच्छा शिवसेनेच्या नेत्यांची आहे. तर भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

अशातच आता राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबतचा पेच सुटल्याची चर्चा असून मुख्यमंत्रिपद हे भाजपकडेच (BJP) जाणार असल्याची सुत्रांती माहिती आहे. त्यामुळे आज सकाळी 11 वाजता एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असून महायुती सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आणि आमदारांची इच्छा आहे. मात्र आता शिवसेनेच्या पदरी निराशा येण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्रिपद हे भाजपला जाणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे.

त्यामुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ वर्षा या निवासस्थानी एकत्र जमण्याचे आवाहन केले होते. मात्र, याबाबतची माहिती समजताच एकनाथ शिंदे आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र न येण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.

ज्यामध्ये त्यांनी लिहिलं, महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे.

मात्र, अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील.', असं आवाहन त्यांनी ट्विटमधून केलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून मतदान केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडका शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक यांनी शिवसेनेवर मतांच्या माध्यमातून जो स्नेहाचा वर्षाव केला, जो विश्वास दाखवला तो आम्ही कधीही विसरणार नाही.

आपण आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. चला महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा एकदा सज्ज होऊया, अशा शब्दात शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT