Satara, 25 November : विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्याचे आठ सुपुत्र राज्यांतील विविध मतदारसंघांत नशीब आजमावत होते. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेस पक्षातून डॉ. ज्योती गायकवाड, भारतीय जनता पक्षातून देवयानी फरांदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर निकम यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून, अन्य चार उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे.
सातारा जिल्ह्यातील (Satara District) अनेक राजकीय नेते राज्यातील विविध भागात रहिवासी आहेत. त्यामधील विधानसभा निवडणुकीत मुंबई, पुण्यासह कोकणात सातारा जिल्ह्याचे मूळचे रहिवासी असणारे उमेदवार उभे राहिले होते.
सातारा जिल्ह्यातील दरे (ता. महाबळेश्वर) मूळचे रहिवासी व विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून उभे राहिलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार केदार दिघे यांचा पराभव केला.
शिवसेनेचे आणि कोरेगाव तालुक्यातील शिरंबे गावचे मूळ रहिवासी, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर या मतदारसंघातून उमेदवार असणारे अभिजित अडसूळ यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गजानन लवटे यांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिपळूण संगमेश्वर येथून उभे राहिलेले व मूळचे अपशिंगे-मिलिटरी गावचे शेखर निकम यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव यांचा पराभव केला.
ओझर्डे (ता. वाई) येथील मूळच्या रहिवासी देवयानी फरांदे यांनी भारतीय जनता पक्षातून नाशिक मध्य येथून तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे, तर कोंडवे येथील मूळचे रहिवासी दिवंगत एकनाथ गायकवाड यांच्या कन्या व काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण डॉ. ज्योती गायकवाड या धारावी या मतदारसंघातून निवडून आल्या. याचबरोबर राज्यातील अन्य तीन मतदारसंघांत तीन उमेदवार, तर एक अपक्ष उमेदवार उभे राहिले होते. यामध्ये त्या चारही उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे.
विजयी
एकनाथ शिंदे - कोपरी-पाचपाखाडी ठाणे (शिवसेना)
डॉ. ज्योती गायकवाड - धारावी (काँग्रेस)
शेखर निकम - चिपळूण संगमेश्वर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
देवयानी फरांदे - नाशिक मध्य (भाजप)
पराभूत
अभिजित अडसूळ - दर्यापूर, अमरावती - (शिवसेना)
अश्विनी कदम - पर्वती पुणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)
सुलक्षणा शिलवंत-धर - पिंपरी (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)
विजय चौगुले - अपक्ष- ऐरोली (मुंबई)
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.