Kolhapur News : ज्या शिवसेनेचा प्रत्येक निवडणुकीतील प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातून होत होता. त्या शिवसेनेला आज कोल्हापुरात एकही जागा मिळवता आली नाही. तर एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाला देखील या मतदारसंघात यश मिळवता आले नाही.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत निष्ठावंत शिवसैनिकांचे पाठबळ नसणाऱ्या शिलेदारांवर विधानसभा निवडणुकीची मदार ठेवल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena) अपयशाला सामोरे जावे लागले. शिवाय निष्ठावंत शिवसैनिक असलेला उमेदवारासाठी ठाकरेंकडून एकही सभा घेण्यात आली नाही. उलट उपऱ्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेत ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचा फटका जिल्ह्यात बसला.
तर दुसरीकडे भाजपकडून (BJP) आयात केलेल्या उमेदवारासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने जनसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीला कोल्हापूर जिल्ह्यात जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांच्या कमतरतेमुळे राष्ट्रवादीला जिल्ह्यात फटका बसला. केवळ नावापुरतेच हे दोन पक्ष कोल्हापूर जिल्ह्यात सध्यातरी दिसत आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे मोठे आव्हान या दोन पक्षापुढे असणार आहे.
एकेकाळी सहा आमदार आणि दोन खासदार कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेला दिले होते. महापालिकेसह खासदारकीपर्यंत शिवसेनेने चांगले संघटन होते. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला सुरूंग लावला.
मात्र, ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत शिंदेंनी शिवसेनेचे धाबे दणाणले. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व दाखवण्याची वेळ लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आली. पण त्या ठिकाणीही ठाकरेंच्या शिवसेनेने नमती भूमिका घेत ही जागा काँग्रेसला दिली. हीच परिस्थिती राष्ट्रवादी शरद पवार गटाची देखील झाली.
विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पुढे जिल्ह्यात अस्तित्व निर्माण करण्याची संधी होती. निवडणुकीत एका रात्रीत दुसऱ्या पक्षातून आलेल्या के. पी. पाटील यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. परंतु, कट्टर शिवसैनिक असलेल्या सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यासाठी एकही जाहीर सभा घेतली नाही.
माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील या दोघांनाही उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना सोडली. त्यामुळे उरलीसुरली ताकदसुद्धा या निवडणुकीत संपली की काय? अशी स्थिती निर्माण झाली.
ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते आणि उपनेते हे देखील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाळ जुळवू शकले नाहीत. केवळ पद आणि आंदोलनासाठी मागेच ठाकरेंची शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यात अस्तित्वात राहिली आहे. ठाकरेंच्या शिवसेना शहराध्यक्षांकडून पक्ष जिवंत ठेवण्यासाठी धडपडी होत आहेत. मात्र जिल्ह्यातील वरिष्ठा नेत्यांकडूनच त्यांना मर्यादा येत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा जोमाने सच्चा शिवसैनिक तयार करावा लागणार आहे. ज्या ताकदीने पूर्वीची शिवसेना आक्रमक होती, जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरत होती, तो कट्टर शिवसैनिक तयार करावा लागणार आहे. यासाठी जिल्ह्यात एकही नेता रसद पुरविणार नाही. खंबीर बॅकबोन नाही. राज्य पातळीवरील नेत्यांचा म्हणावा तितका प्रभाव कोल्हापुरातील जनतेवर नाही, कार्यकर्त्यांवर नाही. त्यामुळे ठाकरेसेनेला पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राष्ट्रवादीची जागा सोडल्याने राष्ट्रवादीचा कोल्हापूर जिल्ह्याची संपर्क तुटला. विधानसभा निवडणुकीत देखील केवळ तीनच जागा वाटणीला घेऊन मतदार संघापुरताच प्रचार वरिष्ठ नेत्यांनी केला. त्याठिकाणी ताकदीने लढा देऊनही त्यांना विजयाची ‘तुतारी’ फुंकता आली नाही. लोकसभेत आश्वासक असा मोठा नेता आणि कोणतीही सत्तास्थाने नसतानाही जुन्या कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म ताकदीने पाळत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा प्रचार करत त्यांच्या विजयामध्ये योगदान दिले.
कोल्हापूर आणि राज्य पातळीवरील यशाने या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. लोकसभेत मिळालेल्या यशाने अनेक जणांनी तुतारी फुंकली. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कागल, चंदगड, राधानगरी-भुदरगड याबरोबर कोल्हापूर उत्तर, इचलकरंजी मतदारसंघांतील जागा महाविकास आघाडीत आपल्याकडे घेण्याचा आग्रह धरला. त्यातून कागल, चंदगड आणि इचलकरंजी या जागा पक्षाला मिळाल्या. मात्र विधानसभेत यश मिळाले नाही. त्यामुळे आता जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यापासून नेत्यांना सुरुवात करावी लागणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश केलेल्यांना संघटन वाढीसाठी योगदान द्यावे लागणार आहे. पक्षसंघटन भक्कम झाले तरच आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व दाखविता येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.