nana patole Election Commission evm Sarkarnama
मुंबई

Election Commission: दारुण पराभवानंतर 'ईव्हीएम'विरोधात रान पेटवणाऱ्या काँग्रेसला मोठा दिलासा; आयोगानं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

Congress Blam Over EVM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील फेरफारच झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेससह महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. मात्र, निवडणूक आयोगानं आत्तापर्यंत वारंवार काँग्रेसचा आरोप फेटाळून लावतानाच विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक झाल्याचा दावा केला आहे. पण तरीही काँग्रेसचं समाधान झालेलं नाही.

Deepak Kulkarni

New Delhi : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या महाविकास आघाडीनं आता ईव्हीएमविरोधात रान पेटवलं आहे. गल्लीपासून सुरू झालेला ईव्हीएमवरील टीकेचा सूर आता दिल्लीपर्यंत पोचला आहे. थेट महायुतीच्या मोठ्या विजयावर आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीवरच शंका उपस्थित केली जात असून दिवसागणिक आघाडीच्या टीकेची धार आणखी टोकदार होत चालली आहे. याच धर्तीवर आता केंद्रीय निवडणूक आयोगानं (Election Commission) मोठं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वात पहिल्यांदा ईव्हीएमवर शंका उपस्थित केलेल्या काँग्रेसला (Congress) थेट चर्चेचं निमंत्रण दिलं आहे.काँग्रेसला आयोगानं 3 डिसेंबरला चर्चेला येण्याचं निमंत्रण दिलं आहे.या चर्चेदरम्यान, काँग्रेसच्या सर्व कायदेशीर समस्यांचं निरसन केलं जाईल असं आश्वासन आयोगानं स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील फेरफारच झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेससह महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे.मात्र, निवडणूक आयोगानं आत्तापर्यंत काँग्रेसचा आरोप फेटाळून लावतानाच विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक झाल्याचा दावा केला आहे.तर ईव्हीएमवर शंका उपस्थित करुन महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचा अपमान केल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात आला आहे.

पवारांना भलताच संशय

जेष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे EVM विरोधात सुरू असलेल्या आत्मक्लेश आंदोलनस्थळी जात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतली. यानंतर या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याची लोकांमध्ये चर्चा असल्याचं पवार म्हणाले. तसंच त्यांनी ईव्हीएमवरही संशय व्यक्त केला.

काही उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी पैसे भरले आहेत. त्यामुळे मजमोजणी दरम्यान काही मतं सेट केल्याचा दावा केला जात आहे. यावर तुमचा विश्वास आहे का?" असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले,लोकांमध्ये अशी चर्चा आहे, पण सध्या माझ्या हातात त्याचा काही पुरावा नाही असंही पवारांनी स्पष्ट केलं.

शरद पवार म्हणाले, निवडणुकीपूर्वी काही लोकांनी ते ईव्हीएम मशीन कसं सेट केलं जात, याबाबतचं प्रेझेंटेशन आम्हाला केलं होतं. मात्र, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आम्हाला वाटलं, निवडणूक आयोग इतक्या टोकाची चुकीची भूमिका घेणार नाही. आम्ही या संस्थेवर गैरविश्वास व्यक्त केला नाही. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर मात्र यामध्ये काहीतरी तथ्य असल्याचं दिसत असल्याचंही पवार यांनी सांगितले.

नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शंका व्यक्त केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रमध्ये जवळपास 76 लाख मतांची वाढ झाली आहे. मात्र, मतदानासाठी रांगा लागलेल्या कुठेही दिसल्या नाहीत. सायंकाळी 62.2 टक्के मतदान झाले होते. मात्र रात्री 66.5 मतदान झाल्याचे सांगण्यात आले. अचानक नऊ लाख मते कशी काय वाढली, याचे आश्चर्य वाटते. निवडणूक आयोग बूथ कॅप्चरिंग करत आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT