Mantralay Farmer Agitation 
मुंबई

Farmer's Agitation: मंत्रालय परिसरात मोठा बाका प्रसंग! गळ्याभोवती दोर अन् सुतळी बॉम्बची पिशवी घेऊन शेतकरी चढला झाडावर, वात पेटवून...

Farmer's Agitation: मंत्रालयाच्या परिसरात एका झाडावर चढून या तरुण शेतकऱ्यानं अत्यंत उद्वीग्नपणे हे आंदोलन केलं आहे. पोलीस त्याला झाडावरुन खाली उतरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Amit Ujagare

Farmer's Agitation: मंत्रालयाच्या परिसरात एका झाडावर चढून या तरुण शेतकऱ्यानं अत्यंत उद्वीग्नपणे हे आंदोलन केलं आहे. पोलीस त्याला झाडावरुन खाली उतरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण हा शेतकरी आपल्या कृतीवर ठाम आहे. हा आंदोलक शेतकरी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळते आहे. पण आंदोलन करताना त्यानं नेमक्या कुठल्या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं ते अद्याप कळू शकलेलं नाही.

रविकांत तुपकर हे क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते आहेत. राज्य शासनानं नुकतीच जाहीर केलेली शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी ही फसवी असल्याचा त्यांचा आरोप आहे. यासाठी राज्यात ठिकठिकाणी त्यांच्या संघटनेकडून आणि कार्यकर्त्यांकडून आंदोलनं सुरु आहेत. काल बुलढाण्यातील खामगाव इथं तुपकारांच्या कार्यकर्त्यांनी हिंसक आंदोलन केलं. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर जाळपोळ करण्यात आली. तसंच एसओडी कार्यालही पेटवण्याचा या आंदोलकांनी रात्री प्रयत्न केला. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे असे हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी या कार्यकर्त्यांनी केली होती.

आज तुपकारांचा एक शेतकरी कार्यकर्ता हा थेट मुंबईत मंत्रालयाजवळ आंदोलनासाठी पोहोचला. त्यानं आपल्यासोबत एक बॅगही आणली होती. ही बॅग घेऊन तो थेट मंत्रालयासमोरील एका उंच झाडावर अगदीच शेंड्याजवळ जाऊन पोहोचला. यावेळी निषेधासाठी त्यानं अंगात काळा टिशर्ट आणि काळी पँट परिधान केलेली होती. त्याचबरोबर सोबतच्या बॅगेत एका प्लॅस्टिकच्या पिशवीत काही सुतळी बॉम्ब आणि एक जाड दोरी होती. ही दोरी त्यानं झाडाच्या एका फांदीला बांधून तिचं दुसरं टोक हे आपल्या गळ्याभोवती गुंडाळलं होतं. झाडावर बसून तो पिशवीतला एक एक सुतळी बॉम्बची वात पेटवून खाली फेकत होता.

दरम्यान, या शेतकऱ्याच्या या आंदोलनाच्या स्टाईलवरुन हे स्पष्ट होतं की, सुतळी बॉम्ब फोडण्यामागे सरकारची कानउघडणी करण्याचा त्याचा मानस असावा तसंच काळे कपडे हे निषेधाचं प्रतिक म्हणून त्यानं परिधान केले होते. तर गळ्यात तो दोरखंडाचा फास लावून बसला होता. यातून त्याला शेतकऱ्यांची होरपळ आणि त्यातून जीव देण्याची आलेली वेळ असं सूचवायचं असेल. त्याच्या या अनोख्या आंदोलनामुळं परिसरातील नागरिकांचं आणि सुरक्षा रक्षकांचं त्यानं लक्ष वेधून घेतलं.

तसंच तिथं असलेल्या माध्यम प्रतिनिधींनीही त्याची ही स्थिती आपल्या वृत्तवाहिन्यांवर लाईव्ह दाखवली. यावेळी त्यानं सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी या कार्यकर्त्याला अश्रू अनावर झाल्याचंही माध्यमांच्या कॅमेऱ्यांमध्ये दिसून आलं. दरम्यान, काही काळापूर्वीच तुपकरांच्या कार्यकर्त्यांनी समुद्रामध्ये जलसमाधी आंदोलनाही केलं होतं. त्यानंतर काही कार्यकर्ते हे झाडावर चढून आंदोलन करत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT