Pappu Kalani Sarkarnama
मुंबई

Pappu Kalani : जेलमध्ये गेल्यावर पप्पू कलानी 32 वर्षांनी काँग्रेस कार्यालयात; चिंरजीवाच्या आमदारकीसाठी मोर्चेबांधणी

Pappu Kalani son of Omi active again for MLA : काँग्रेसमधील पप्पू कलानी पुत्र ओमी कलानी यांच्या आमदारकीच्या मोर्चेबांधणीसाठी पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत. यासाठी ते 32 वर्षांनंतर काँग्रेस कार्यालयात आले. त्यांचे चिरंजीव ओमी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

Pradeep Pendhare

Mumbai News : काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांमधील एक नाव म्हणजे, पप्पू कलानी. गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर असलेले पप्पू कालानी त्यांचे पुत्र ओमी कलानींसाठी पुन्हा सक्रिय झालेले दिसतात.

तब्बल 32 वर्षानंतर पप्पू कलानी यांनी काँग्रेस कार्यालयाला भेट दिली. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. परंतु संवादाचा तपशील गुलदस्त्यातच आहे. चिरंजीव ओमी कलानी यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उल्हासनगर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी रणशिंग फुंकले आहे.

काँग्रेसमधून (Congress) नगरसेवक, नगराध्यक्ष आणि आमदार अशी सुरवात करून हत्या प्रकरणात आणि जन्मठेपेची शिक्षा लागल्याने जेलमध्ये गेलेले पप्पू कलानी आता जेलच्या बाहेर आले आहेत. 1986 साली पप्पू कलानी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1987 मध्ये ते नगराध्यक्ष झाले आणि 1990 साली ते काँग्रेसचे आमदार झाले. पप्पू कलानी यांनी नेहरू चौकातील काँग्रेस कार्यालयाला शेवटची भेट ही 1992 मध्ये दिली होती.

याच दरम्यान रिक्षा युनियनचे नेते मारुती जाधव यांच्या हत्येप्रकरणी टाडा लावण्यात आला. पुढे याच प्रकरणात त्यांना अटक केल्यावर काँग्रेस पक्षाने पप्पू कालानी यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढले. मारुती जाधव हत्या प्रकरणात पप्पू कलानी 1992 ते 2002 असे जवळपास 10 वर्षे पुण्याच्या येरवडा कारागृहात राहिले. त्यांची जामिनावर सुटका झाल्यावर उल्हासनगरात केर आयो पप्पू शेर आयो हे गाणे गुंजले होते. आणि 2002 मध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत पप्पू कलानी यांनी राष्ट्रवादीची (NCP) एकहाती सत्ता आणली.

2012 मध्ये न्यायालयाने पप्पू कलानी यांना इंदर बठीजा हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आणि कोरोनाच्या काळात 70 वर्षांवरील कैद्यांना मुभा देण्यात आल्याने कलानी 2021 मध्ये जेलच्या बाहेर आले. अशात ओमी कलानी यांची पत्नी पंचम कालानी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष असतानाही ओमी यांनी कल्याण लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे याच्याशी दोस्ती का गठबंधन निभावताना विधानसभा निवडणूक लढवणार, असे जाहीर केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागणार आणि तिकीट मिळाले नाही, तर अपक्ष उभे राहणार, असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार टीम ओमी कलानी यांच्या कोअर कमिटीची बैठक गोव्यात झाली आहे. विशेष म्हणजे, या कमिटीचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते डॉ.जयराम लुल्ला आहेत. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही भेट दिली होती.

जेलमधून आल्यापासून पप्पू कलानी ओमी कालानी यांना निवडून आणण्यासाठी सक्रिय झाले असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी 32 वर्षांनी काँग्रेस कार्यालयाला भेट देऊन जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्याशी मोर्चेबांधणीवर चर्चा केली आहे. यावेळी टीम ओमी कलानीचे कमलेश निकम, मनोज लासी, काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे म्हणाले, "ओमी कलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. राष्ट्रवादी पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीत असून आम्ही एकदिलाने ओमी यांचे काम करणार आहोत". पक्षाकडून तिकीट मिळाले नाही आणि ओमी यांनी अपक्ष निवडून लढवली आणि महाविकास आघाडीने त्यांना समर्थन दिले, तरी ओमी यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस प्रचारात उतरणार, असे रोहित साळवे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT