Mumbai News: एफडीएचे आयुक्तपदावर विराजमान झाल्यावर तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. सध्या राज्यभर अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात धडक मोहीम सुरु आहे.
तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सोमवारी मुंबईतील तब्बल ६ मोठ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांवर छापा टाकला. कायद्याचे उलंघन केल्याप्रकरणी संबधितांचे थेट लायसन्स रद्द केले. यामुळे मुंबई परिसरात हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
मुंबईतील खाद्य व्यवसायांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू ठेवली असून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक आस्थापनांवर कठोर पावले उचलण्यात आली आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.
अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या सहा आस्थापनांचे परवाने थेट निलंबित करत त्यांनी मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांना कडक संदेश दिला आहे. त्यांच्या या धडक कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून मुंढे यांच्या कारवाईची भीती निर्माण झाली आहे.
२७ जून रोजी नरिमन पॉइंट येथील प्रसिद्ध ‘फ्लिंट अँड वार्सा’ या रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगचे प्रकार समोर आले. काही खाद्यपदार्थांबाबत ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित रेस्टॉरंटविरोधात कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने संबंधित आस्थापनेचा परवाना निलंबित केला.
बोरीवली येथील एम. के. बेकरीवरही FDA ने कारवाई केली. बेकरीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असतानाही अन्न उत्पादन सुरू असल्याचे तपासणीत आढळले. याशिवाय उत्पादन विभागात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून प्रशासनाने संबंधित आस्थापनाविरोधात कठोर कारवाई केली.
याशिवाय भांडुप, सांताक्रूझ आणि वांद्रे परिसरातील काही खाद्य आस्थापनांचीही तपासणी करण्यात आली. या ठिकाणीही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, स्वच्छतेचा अभाव आणि नियमबाह्य पद्धतीने अन्न उत्पादन केल्याचे प्रकार समोर आल्याने कारवाई करण्यात आली आहे.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास किंवा कुठेही अस्वच्छता आढळल्यास नागरिकांनी त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन FDA कडून करण्यात आले आहे. यासाठी प्रशासनाने 1800222365 हा टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.