K.P. Raghuvanshi Biography:पोलीस दलातून रिटायर झाल्यानंतर एका दशकानंतर महाराष्ट्र एटीएसचे (ATS) माजी प्रमुख के.पी. रघुवंशी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
आपल्या कार्यकिर्दीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी इंद्रेश कुमार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना अटक करण्यासाठी आपल्यावर दबाव होता, असे के.पी. रघुवंशी यांनी म्हटलं आहे.
माजी एटीएस प्रमुख के.पी. रघुवंशी सध्या त्यांच्या 'ट्रबलशूटर' (Troubleshooter) या पुस्तकामुळे चर्चेत आले आहेत. पत्रकार जितेंद्र दीक्षित यांनी लिहिलेल्या या पुस्तकात रघुवंशी यांनी त्यांच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीतील अनेक ऑफ-रेकॉर्ड, पोलिसदल, प्रशासकीय घडामोडींवरून भाष्य करीत गौप्यस्फोट केला आहे.
केंद्रातील तत्कालीन युपीए सरकार, आणि महाराष्ट्र सरकार मधील काही मंत्री आपल्यावर दबाब टाकत होते, यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे. मुंबईमध्ये या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले.
तत्कालीन युपीए सरकारमधील एका बड्या नेत्यांचा मला फोन आला होता, त्यांनी मला 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरएसएसचे इंद्रेश कुमार यांना अटक करण्यासाठी सांगितले होते, असे के.पी. रघुवंशी यांनी पुस्तकात म्हटलं आहे. पुरेसे पुरावे नसल्यामुळे इंद्रेश कुमार यांना अटक करता येणार नाही, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी नेत्यांना नकार दिला होता.
'ट्रबलशूटर' (Troubleshooter) या आत्मचरित्रात्मक पुस्तकात आणखी एका जुन्या प्रकरणावर भाष्य केले आहे. 1993 मध्ये मुंबई झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणानंतर उसळलेल्या दंगली प्रकरणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यासाठी सांगितले होते. पण यालाही के.पी. रघुवंशी यांनी सपशेल नकार दिला होता.
महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख असताना आपल्या कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वी के.पी. रघुवंशी यांची महाराष्ट्र सरकारने उचलबांगडी केली होती. त्यांच्याबदली मागे या राजकीय नेत्यांना अटक न करण्यासबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेची संबध जोडण्यात आला आहे. माहिती 'लीक' केल्याचे निमित्त करून त्यांची एटीएस प्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.पण याबाबतचा कोणताही ठोस पुरावा या पुस्तकात देण्यात आलेला नाही.
या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी अनेक मोठे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी पुण्याचे माजी आयुक्त, राज्याचे माजी पोलिस संचालक ए.एन. रॉय यांच्या उपस्थित पुस्तकाचे प्रकाशन झाले. मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, सीबीआयचे माजी संचालक सुबोध जयस्वाल, माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, सध्याचे एटीएसचे प्रमुख नवल बजाज आदी उपस्थित होते.
2015 मध्ये के पी रघुवंशी हे महाराष्ट्र सिक्योरिटी फोर्स चे महासंचालक रिटायर झाले होते. ते आता इंडियन प्रीमियर लीगची फ्रैंचाइजी राजस्थान रॉयल्स की व्हिजिलेन्स यूनिटचे प्रमुख आहेत.
अनेक वादांमुळे नव्हे तर आपल्या धडाकेबाज कामासाठी के. पी. रघुवंशी ओळखले जातात. 1980 च्या बॅचचे अधिकारी असलेल्या रघुवंशी यांनी त्यांच्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या विभागांचे नेतृत्व केले. यामध्ये मुंबई दंगलीवरील श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करणारे विशेष कार्य दल (STF), महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि ठाणे पोलीस आयुक्तलयाचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.