Navi Mumbai Politics : नवी मुंबईत महापालिकेच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात गदारोळ उठवणाऱ्या वाशी सेक्टर ९ मधील नैवेद्य आणि अलबेला इमारत प्रकरणात राज्य उच्चस्तरीय चौकशी समितीने नगररचना विभागाचे तत्कालीन सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण यांना क्लीनचिट दिल्याचे समजते आहे.
या प्रकरणात कोणतीही गुन्हेगारी स्वरूपाची अनियमितता किंवा भ्रष्टाचार झाला नसल्याचे अहवालात स्पष्ट केल्याची चर्चा आहे. यामुळे सत्ताधारी गटाच्या मनसुब्यांवर सपशेल पाणी फेरल्याचे पालिका वर्तुळात बोलले जात आहे.
उप-अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी नगररचना विभाग आणि राजकीय दबावाचा कांगावा करीत फायर एनओसी रद्द करण्याचा प्रकार केला होता, तो भाग आता चौकशीत उघड झाला आहे. राज्य अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक आणि नगररचना सह-संचालक विजय कुमार वाघमोडे यांच्या समितीने केवळ तांत्रिक व प्रक्रियात्मक त्रुटी वगळता कोणताही बेकायदा व्यवहार झाला नसल्याचा शिक्का मारल्याचे समजते आहे.
यामुळे विशेष महासभेत विरोधकांनी केलेला गदारोळ, केकाण यांना कार्यमुक्त करण्याचा घेतलेला घाईगडबडीतील ठराव आणि अधिकाऱ्यांना बळीचा कासरा बनवण्याचे राजकारण अहवालामुळे निष्प्रभ ठरले आहे. पारदर्शकतेच्या नावाखाली खेळले गेलेले हे सत्ताधाऱ्यांचे नाट्य अखेर अंगाशी आले आहे.
शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर म्हणाले की, महापालिकेत सत्ताधारी मनमानी करीत आहेत. खरेतर आयुक्तांनी चौकशी करून तसा ठराव सर्वसाधारण सभेत आणायला हवे होते. मात्र, सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी नियमबाह्य ठराव करून एका चांगल्या अधिकाऱ्याला बदनाम करणे योग्य नाही. गणेश नाईक यांनी इमारत तोडायचे आदेश दिले होते. इमारतींविरोधात कटकारस्थाने रचणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही.
संपूर्ण नाट्यात भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात इमारतींवर निष्कासनाची आक्रमक भूमिका घेतली होती, तर आमदार मंदा म्हात्रे यांनी रहिवाशांच्या बाजूने उभे राहत कारवाईला ठाम विरोध केला होता. आता चौकशी समितीच्या निष्कर्षामुळे इमारतींचे बांधकाम नियमानुसारच असल्याचे सिद्ध झाल्याने नाईक गटाच्या राजकीय दबावाला प्रशासनाने थेट केराची टोपली दाखवली आहे.
समितीने संबंधित सर्व नस्ती, प्रारंभ, भोगवटा प्रमाणपत्रे आणि फायर एनओसीच्या तांत्रिक मंजुरीची पडताळणी केली. यादरम्यान पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रशासकीय वर्तनावरही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्यावर नगररचना विभागाकडून दबाव आणला जात होता, तर त्यांनी आयुक्त किंवा वरिष्ठांकडे लेखी तक्रार का दाखल केली नाही, असा सवाल उपस्थित करीत कैलाश शिंदे यांनी पुरुषोत्तम जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. समितीने अंतिम अहवाल आयुक्तांना सादर केल्याचे समजते आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.