Suresh Khade Sarkarnama
मुंबई

Suresh Khade News : जनरल मोटर्सचे कर्मचारी आक्रमक; थेट कामगार मंत्री खाडेंच्या बंगल्यावर मोर्चा

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : मावळातील तळेगाव एमआयडीसीमधील जनरल मोटर्स ही कंपनी दोन वर्षांपूर्वी व्यवस्थापनाने बंद केली आहे. याचा फटका तब्बल साडेतीन हजार कार्मचाऱ्यांना बसला आहे. ही कंपनी ह्युंदाई मोटर्सला विकली असून, तेथे जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर घेतले गेले नाही. याविरोधात संबंधित कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला असला तरी सरकारचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. परिणामी आक्रमक झालेल्या या कर्मचाऱ्यांनी थेट कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीतील बंगल्यावरच मोर्चा काढला आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. (Latest Political News)

पुण्यातील जनरल मोटर्समधील 50 ते 60 कुटुंबांतील कार्मचारी बुधवारी सांगलीतील मंत्री खाडे यांच्या बंगल्यासमोर दाखल झाले आहेत. कामगारांची फसवणूक केल्याचा आरोप करत कामगारमंत्री खाडेंना जाब विचारणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाली. परिणामी सुरेश खाडे यांच्या बंगल्यासमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जनरल मोटर्स या अमेरिकन कंपनीचा तळेगाव पुणेमधील प्रकल्प ह्युंदाई मोटर्सला विकला जात आहे. हा करार होत असताना जनरल मोटर्सच्या एक हजार कायमस्वरूपी कामगारांचा रोजगार नव्याने येणाऱ्या कंपनीत दिला जात नाही. नवीन येणाऱ्या ह्युंदाई मोटर्स कंपनीमध्ये जनरल मोटर्सच्या सर्व कामगारांच्या सेवा शर्तीसहीत नोकऱ्या हस्तांतरित व्हाव्यात, अशी कामगारांची प्रमुख मागणी आहे. मात्र याची शासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नाही, असा आरोप करीत कामगार मंत्र्याच्या घरावर संबंधित कर्मचाऱ्यांनी धडक मारली.

दरम्यान, जनरल मोटर्समधील कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांत कलगीतुरा रंगला आहे. विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीसांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जनरल मोटर्सच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्र लिहिले होते. याची आठवण करून देत सध्या सत्ताधारी असलेल्या उपमुख्यमंत्री फडणीस यांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी कोंडीत पकडले.

"तीन वर्षांपासून या कामगारांचा संघर्ष सुरू आहे. सातत्याने हे कामगार रस्त्यावर येत आहेत. विरोधात असताना फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आवाहन केले होते. आता केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने देवेंद्रजींनी हा प्रश्न आता मार्गी लाववा, अशी मागणी अंधारेंनी केली होती.

या कामगारांच्या प्रश्नावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले, सत्तेत आल्यावर कामगारमंत्री सुरेश खाडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फडणवीसांच्या पत्राची दखल घेतली नाही. उलट कामगारांच्या भावना न जाणून घेता कंपनी क्लोजरची परवानगी दिली. खाडेंचा हा निर्णय बेकायदेशीर असून, साडेतीन हजार कामगारांच्या पोटावर पाय देणार आहे. त्यांना कुणाचा फोन आला? यासाठी त्यांना किती मलिदा मिळाला? अशा सत्ताधारी नेत्यांना लाज वाटली पाहिजे, असा घणाघात वडेट्टीवारांनी सरकारवर केला होता.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT