Amruta & Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Amruta Fadnavis News : माझ्या वडिलांना जेलबाहेर काढा; तुम्हाला एक कोटी देते : अमृता फडणवीसांना ऑफर

आमचे सर्व पक्षाशी संबंध आहेत. तुम्ही आम्हाला मदत करा.

Vijaykumar Dudhale

मुंबई : माझे वडील सर्व बुकीजला ओळखतात. मागील काळात आम्ही ही माहिती पोलिसांना द्यायचो आणि त्या ठिकाणी छापा टाकला जायचा. त्यावेळी आम्हाला दोन्हीकडून पैसे मिळायचे. तुम्ही थोडी मदत केली तर आपणही अशी छापेमारी करवू शकतो. एकतर तुम्ही आमच्याबरोबर हा धंदा करा; नाहीतर माझ्या वडिलांना जेलबाहेर काढा. त्यासाठी मी तुम्हा एक कोटी रुपये देईन, अशी ऑफर एक मुलीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना दिली होती. (Get my father out of jail; Gives you one crore : Offer to Amruta Fadnavis)

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फर्मेशन’द्वारे विधानसभेत अमृता फडणवीस यांच्यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला. त्याला फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, अनिल जयसिंघानी नावाची व्यक्ती गेली सात आठ वर्षांपासून फरार आहे. त्याच्यावर १४ ते १५ गुन्हे आहेत. त्याची एक मुलगी २०१५-१६ अमृता फडणवीस यांना भेटत होती. त्यानंतर तिचं येणं बंद झाला. पण, अचानक २०२१ पासून त्या मुलीने माझ्या पत्नीला भेटायला सुरुवात केली. डिझायन, आर्टिफिशयल ज्वलेरी तयार करते, अशी ती सांगायची. त्यानंतर तिने तिच्या आईवरील पुस्तकाचे प्रकाशनही अमृता यांच्या हस्ते करवून घेतले आणि विश्वास संपादन केले.

फडणवीस यांनी सांगितले की, डिझाईन क्लॉथ वापरण्याची तिने अमृता यांना ऑफर केली. त्यांनीही ते वापरले. पण एके दिवशी त्या मुलीने अमृता यांना सांगितले की, माझ्या वडिलांना चुकीच्या केसमध्ये अटक झाली आहे, तुम्ही त्यांना सोडवा. त्यावर अमृता यांनी सांगितले की, तुझं जे निवेदन असेल ते तू देवेंद्र फडणवीस यांना दे. हे तिने सरकार बदलल्यावर सांगितले.

एके दिवशी ती मुलगी म्हणाली की, माझे वडील सर्व बुकीजला ओळखतात. मागील काळात आम्ही ही माहिती पोलिसांना द्यायचो आणि त्या ठिकाणी छापा टाकला जायचा. त्यावेळी आम्हाला दोन्हीकडून पैसे मिळायचे. तुम्ही जर थोडी मदत केली तर आपणही असे छापेमारी करवू शकतो. त्यावर ‘हे आमचे काम नाही. अशा फालतू गोष्टी माझ्याशी करायच्या नाहीत,’ असे अमृता यांनी त्या मुलीला ठणकावून सांगितले.

त्यानंतरही ती संपर्कात होती. आपण अशा प्रकारे जरा धंदा केला, तर आपला फायदा होईल, असे एके दिवशी सांगितले. एकतर हा धंदा आपण करूयात, नाहीतर माझ्या वडिलांना सोडविण्यसाठी मी एक कोटी देते. त्यांना जेलबाहेर काढा, अशी ऑफर तिने माझ्या पत्नीला दिली होती. माझ्या पत्नीने स्पष्टपणे सांगितले की, चुकीच्या पद्धतीने ते फसले असतील तर त्यांना पोलिसांमधून त्यांना सोडविता येईल. नसेल तर सोडविता येणार नाही. पण तू मला हे सांगू नकोस.

बुकींचा विषय वारंवार यायला लागल्यावर अमृता फडणवीस यांनी त्या मुलीला ब्लॉक केले. ब्लॉक केल्यानंतर दोन दिवसांनी एका अनोळखी नंबरवरून मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आणि क्लीप आल्या. काही व्हिडिओ आले. त्यात एक व्हिडीओ गंभीर दिसला. त्यात ती मुलगा एका बॅगेमध्ये पैसे भरतेय आणि त्यानंतर तसाच एक दुसरा व्हिडिओ तिने पाठवला. त्यात ती बॅग आमच्या घरी काम करणाऱ्या बाईला देते आहे.

त्यानंतर काही धमक्याचे व्हिडिओही टाकले आहेत. हे आम्ही व्हायरल केले तर तुमच्या नवऱ्याची नोकरी जाऊ शकते. आमचे सर्व पक्षाशी संबंध आहेत. तुम्ही आम्हाला मदत करा. आमच्यावरील सर्व केसेस परत घेण्याची कार्यवाही सुरू करा, अशी धमकी दिली. त्यानंतर माझ्या पत्नीने हे सर्व सांगितले. मी पोलिसांना बोलावून झालेला प्रकार सांगितला आणि फिर्याद दाखल केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT