Gopichand Padalkar  Sarkarnama
मुंबई

दरेकरांच्या गाडीला महिन्यात तिसऱ्यांदा अपघात अन् पडळकर म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या ताफ्यातील गाडीला आज मुंबईत अपघात झाला. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर हा अपघात घडला. सुमारे महिनाभरात दरेकर यांच्या गाडीचा अपघात होण्याची ही तिसरी वेळ आहे. यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त होत असून, भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी यावरून राज्य सरकारला सुनावले आहे.

दरेकरांच्या गाडीला झालेल्या अपघाताबद्दल पडळकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीविरोधात दरेकर हे मागील अडीच वर्षांपासून आवाज उठवत आहेत. समाजातील क्रूर प्रवृत्ती, भ्रष्टाचार, गुंडगिरी, घोटाळे यावर ते वारंवार आवाज उठवत आहेत. यामुळे सरकार गडबडून गेले आहे. दरेकर राज्यभर दौरे करुन जनतेचे सुख-दुःख वाटून घेत आहेत. दरेकरांच्या गाड्यांना तीन वेळा अपघात झाला असून, यात तीन गाड्यांचे नुकसान झाले असून, काही पोलीसही जखमी झाले आहे. विरोधी पक्षनेते दरेकर यांना राज्य सरकारने पुरेशी सुरक्षा द्यावी. सरकारने त्यांची सुरक्षा वाढवावी.

दरेकरांच्या गाडीला अपघात होताच त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, भाजपच्या कामासाठी मी राज्यभरात फिरत असतो. महिनाभरात माझ्या गाडीला झालेला हा तिसरा अपघात आहे. काही दिवसांपूर्वी मालेगावमध्ये आणि त्यानंतर खंडाळ्यात माझ्या गाडीचा अपघात झाला होता. प्रत्येक वेळी गाडीसमोर दुचाकीस्वार आल्याने अपघात घडला आहे. आजही मुंबईत गाडीसमोर अचानक दुचाकीस्वार येऊन अपघात घडला. त्यामुळे यात मला घातपाताचा संशय येत आहे. या प्रकरणी मी चौकशीची मागणी करणार आहे. यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहणार आहे.

नुकताच दरेकर यांच्या ताफ्यातील गाडीला पुणे-बंगळूर महामार्गावरील परगाव-खंडाळा येथे अपघात झाला होता. सातारा जिल्ह्याच्या हद्दीत हा अपघात घडला होता. या अपघातात भाजप नेते दरेकरांना इजा झालेली नव्हती. दरेकर हे त्यावेळी सातारा दौऱ्यावर होते. आता पुन्हा त्यांच्या गाडीला अपघात झाल्याने यामागे घातपात असल्याचा संशय भाजप नेते व्यक्त करू लागले आहेत. एकाच महिन्यात तीन वेळा एकाच प्रकारे अपघात घडल्याने याबद्दल आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT