मुंबई : विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवरून पुन्हा एकदा राज्यपाल व महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकार आमनेसामने आले आहेत. अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम निश्चित करण्याची विनंती सरकारकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh koshyari) यांना करण्यात आली आहे. राज्यपालांनी कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज राज्यपालांनी बंद लिफाफ्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी संदेश पाठवला आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत राज्यपालांना तीन पत्र पाठवली होती. तिसऱ्या पत्राला राज्यपालांनी उत्तर दिलं आहे. हे उत्तर नकारात्मक असेल तर महाविकास आघाडीच्या अडचणी वाढू शकतात. कायदेशीर अडचणी आल्यास महाविकास आघाडीला निर्णय घ्यावा लागू शकतो. त्यामुळे पुढील काही वेळात मुख्यमंत्र्यांना निवडणुकीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. पण राज्यपालांनी पत्रात काय म्हटलं आहे, यावरून संभ्रम आहे.
राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक घेण्याच्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे. पण राष्ट्रवादी व शिवसेनेचा त्यास विरोध असल्याचे समजते. राज्यपालांनी संमती न दिल्यास अनेक कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतात, यामुळे हे दोन्ही पक्ष आग्रही नसल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेस एकाकी पडल्याचे दिसते. पण आता राज्यपालांच्या पत्रात नेमकं काय आहे, यावर सर्वकाही अवलंबून राहणार आहे.
आजच निवडणूक घ्यायची म्हटलं तरी वेळ खूपच कमी आहे. अर्ज भरण्यासह मतदान ही प्रक्रिया खूप कमी वेळात पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे राज्यपालांनी पत्रात नकारात्मक उत्तर दिलं असल्यास महाविकास आघाडी सरकारला तातडीने निवडणुकीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. पण निवडणुकीबाबत सध्यातरी मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराचे नाव निश्चित झाले नसल्याचे समजते. त्याबाबत अजूनही संभ्रमावस्था असल्याचे आमदारांकडूनच सांगितले जात आहे.
दरम्यान, काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे यापुर्वी विधानसभेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यात सत्तेच्या वाटाघाटील विधानसभेचे अध्यक्षपद (Assembly President Election) काँग्रेसकडे आले आणि नाना पटोले बिनविरोध या पदावर विराजमान झाले. पण पुढे पक्षाच्या एक व्यक्ती एक पद या नियमानुसार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडील प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीसाठी नवीन खंदा शोधण्याची मोहिम सुरु झाली. काँग्रेसचा हा शोध नाना पटोले यांच्यापर्यंत येवून थांबला. त्यांनी फेब्रुवारीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देवू केला. तेव्हापासून हे पद रिक्त आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.