Maha Agadhi Leader-Governor Bhagat Singh Koshyari
Maha Agadhi Leader-Governor Bhagat Singh Koshyari Sarkarnama
मुंबई

राज्यपाल-महाआघाडी संषर्घ वाढणार : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा प्रस्ताव परत पाठवला!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा महाविकास आघाडीचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी परत पाठवल्याने ही निवड पुन्हा लांबणीवर पडली आहे. राज्यपाल मंजुरी देत नाहीत; तोपर्यंत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस नेत्यांना (Congress) आज सांगितले. या प्रकरणामुळे राज्यपाल विरोध महाआघाडी असा संषर्घ पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत. (Governor sends back election proposal for Assembly Speaker!)

गेली वर्षभरापासून विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून राज्यपालांकडे मागणी करण्यात येत आहे. मात्र, अजूनपर्यंत त्यांच्याकडून निवडणुकीची तारीख जाहीर होऊ शकलेली नाही. अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीऐवजी हात वर करून आवाजी पद्धतीने घेण्यासाठी राज्य सरकारने कायद्यात बदल केला आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी महाआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटून याबाबतची तारीख देण्याची मागणी केली होती. मात्र, तो प्रस्ताव आता राज्यपालांनी परत पाठवल्याने राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी, यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह पक्षाचे आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधीमंडळात भेट घेतली. त्या भेटीत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी, ही मागणी काँग्रेस आमदारांनी केली. मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारकडून तीन वेळा शिष्टमंडळ राज्यपाल काेश्यारी यांना भेटले. त्यांना निवडणुकीचा प्रस्ताव दिला. पण, राज्यपालांनी अद्याप मंजुरी दिली नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे याही अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होण्याची चिन्हे कमी आहेत.

राज्यपाल मंजुरी देत नाही; तोपर्यंत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते आणि आमदारांना स्पष्टपणे सांगितल्याची माहिती आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारने केलेल्या बदलाबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित आहेत, त्यामुळे या निवडणुकीची तारीख निश्चित करू शकत नाही, असे सांगून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणुकीचा प्रस्ताव परत पाठविल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की राज्यापालांनी सर्वोच्च न्यायालयाचे कारण दिले असले तरी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचेही जरा ऐकले असते तर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सध्या जे राजकारण सुरू झाले आहे. ते झाले नसते. राज्यपालाचे वागणे हे ‘भाजपाल’सारखं आहे, राज्यपालासारखे नाही, असा टोला त्यांनी कोश्यारी यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT