वालचंदनगर (जि. पुणे) : अचूक आणि निर्दोष मतदारयादी ही सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा आत्मा असतो. पण, इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला ऊस न घालणाऱ्या सभासदांना (अक्रियाशिल) मतदानाचा अधिकार देवून निवडणुका जिंकण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांचा डाव आहे, असा आरोप छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केला. (Prithviraj Jachak accuses NCP's ruling board of directors of Chhatrapati Sugar Factory)
साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी या संदर्भात काढण्यात आलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, छत्रपती कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वारे वाहू लागताच कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळ बिगर ऊस उत्पादकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. कारखान्याच्या पाेटनियमामध्ये कारखान्यास पाच गळीत हंगामांपैकी किमान तीन हंगामामध्ये ऊस पुरविण्याची अट उमेदवारांना व मतदान करणाऱ्यांना लागू आहे. तसेच, कारखान्याची व इतर कुठल्याही सहकारी संस्थेची थकबाकी असेल तर उमेदवारास निवडणूक लढविण्याचा व मतदारास मतदान करण्याचा अधिकार नाही. सध्या ऊस न घालणाऱ्यांमध्ये व थकबाकी असलेल्यांमध्ये सत्ताधारी व विरोधी पॅनेलचे सभासद आहेत. मी कुठल्याही सभासदांच्या विरोधात नाही. निवडणुकीमध्ये मतदान करण्याच्या अधिकारापुरती न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. ऊस न घातलेल्या सभासदांनी उस घातल्यानंतर त्यांनाही निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार मिळतो.
सध्या राज्यात उस न घालणारे सभासद करुन घ्यायाचे, त्यांना मतदानाचा अधिकार देऊन निवडणूक जिंकण्याचे कट कारस्थान सुरु आहे. कालांतराने चांगले चालले सहकारी कारखाने तोट्यात घालून ते पुन्हा अल्पदरात खासगी करण्याचे मोठे षडयंत्र राज्यात सुरू आहे. त्यातून सहकार चळवळ अडचणीत येत आहे. अशीच परिस्थिती छत्रपती कारखान्यामध्ये निर्माण करण्याचा डाव आहे. आगामी निवडणुकीमध्ये छत्रपती कारखान्याच्या सभासदांना ऊस उत्पादकांचे संचालक मंडळ पाहिजे की, बिगर ऊस उत्पादकांचे संचालक मंडळ पाहिजे, हे ठरविण्याची वेळ आली आहे. या निवडणुकीमध्ये सभासद जागा झाला नाही तर परत या प्रवृत्तीला विरोध करायचे धाडस भविष्यात कुणीही करणार नाही, असा सूचक इशाराही जाचक यांनी दिला.
बिगर ऊस उत्पादकांना संस्थेच्या हिताशी काहीही देणे घेणे नसते. मतदानापूर्वी अनावश्यक तडजोडी करून निवडणूक जिंकायची, हे सूत्र नव्याने झाले असून त्याची कल्पना छत्रपती कारखान्याच्या सभासदासह राज्यातील सर्व नागरिकांना आहे. छत्रपती कारखाना हा आपला प्रपंच असून आपल्या प्रपंचापेक्षा कोणीही मोठे नाही, याची खूणगाठ सभासदांनी मनाशी बांधावी. आगामी निवडणुकीत कुठल्याही दबावाला व भूलथापांना बळी न पडता साथ देवून गेली १९ वर्ष कारखान्यात मनमानी कारभार करून कारखान्याच्या नियम, पोटनियम यांना हरताळ फासण्याचे काम करणणाऱ्या संचालक मंडळ घरी बसविण्याची गरज आहे, असे जाचक यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.