Guardian Minister Sarkarnama
मुंबई

Flag Hoisting Ceremony: सरकारमधील पालकमंत्र्यांचा तिढा कायम; पण झेंडावंदनाचं ठरलं ! कोण कुठे करणार, पाहा यादी

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारमधील प्रवेशाने अनेकांना धक्का बसला आहे. मंत्रिपदाचे दावेदार समजले जाणारे शिंदे गटाचे आमदार आणि भाजपचे आमदार त्यामुळे पुन्हा वेटिंग लिस्टवर गेले आहेत. अजित पवार यांच्यासह ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे खातेवाटपात फेरबदल झाले. त्याचप्रमाणे आता पालकमंत्रीही बदलले जाणार आहेत. अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद येण्याची शक्यता आहे. पण १५ ऑगस्टला ध्वजारोहणासाठी नेतेमंडळींवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन ४० दिवस उलटले आहेत. रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून टीकेचे धनी झालेल्या युती सरकारमध्ये पालकमंत्रीपदाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नव्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा असताना काही जिल्ह्यांचा पदभार एकाच मंत्र्याकडे असल्याने १५ ऑगस्टला झेंडावंदन कुणाच्या हस्ते करणार याबाबत पुन्हा एकदा पेच निर्माण झाला होता. तर काही ठिकाणी पालकमंत्री बदलाची शक्यता आहे.

राज्य सरकारमध्ये सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्या गटाला पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाणार आहे. आगामी काळात होत असलेल्या पालकमंत्र्यांच्या संभाव्य बदलांत पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांना दिले जाईल. तर पुणे भाजप आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचा या बदलाला विरोध आहे. पण यासंबंधीचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असल्याचे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - मुंबई, देवेंद्र फडणवीस - नागपूर, अजित पवार- कोल्हापूर, छगन भुजबळ - अमरावती, सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर, चंद्रकांत पाटील- पुणे, दिलीपराव वळसे पाटील- वाशिम, राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर, गिरीश महाजन- नाशिक, दादा भुसे - धुळे, गुलाबराव पाटील-जळगाव, रवींद्र चव्हाण- ठाणे, हसन मुश्रीफ - सोलापूर, संजय बनसोडे - लातूर, धर्मराज आत्राम - गडचिरोली, संजय राठोड- यवतमाळ, धनंजय मुंडे - बीड, पालघर - आदिती तटकरे यांच्यासह अनेक ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

आगामी काळात होत असलेल्या नव्या बदलांत बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना, तर कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांना मिळण्याची शक्यता आहे. तर लातूरची जबाबदारी संजय बनसोडे यांना तर भंडारा गोंदियाच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी धर्मरावबाबा आत्राम यांना, नाशिकची जबाबदारी छगन भुजबळ यांना देण्याचा निर्णय झाला असल्याचे समजते. मात्र याबाबतची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)च्याकडे सहा जिल्ह्याचे तर गिरीश महाजन यांच्याकडे तीन जिल्ह्याचा तर राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, अतुल सावे यांच्याकडे दोन जिल्ह्याचा सध्या स्थितीत पदभार आहे. पुणे जिल्हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांचे सर्वाधिक लक्ष पुणे जिल्ह्याकडे असते.

विरोधी बाकावर असतानाही ते पुण्यात सातत्याने बैठका घेत होते. त्यामुळे पुण्यातील कार्यकर्ते व नेत्यांना तेच पालकमंत्रीपदी (Guardian Minister)हवे आहेत. तर दुसरीकडे सद्यस्थितीत पुण्याचे पालकमंत्रीपद भाजपकडे आहे. त्यामुळे हे पद हातातून निसटले तर त्याचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. एकीकडे पालकमंत्रीपदाचा घोळ कायम राहिला असून तात्पुरता मार्ग काढताना ध्वजारोहणाचा तिढा मात्र सुटला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT