Thane Political News: ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांची पॉवर आणि मुंब्य्रात आमदार माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा करिश्मा कायम असल्याचा दावा बुधवारी फोल ठरला. याला निमित्त घडले ते अजित पवार गटाच्या पक्षकार्यालय उद्घाटनाचे. या उद्घाटनाला कालपर्यंत आव्हाड यांच्या सोबत असलेल्या दोन माजी नगरसेवकांनी चक्क व्यासपीठावर हजेरी लावली. विशेष म्हणजे कार्यक्रमानंतर नजीब मुल्ला यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या 'दावत'ला १७ पैकी १२ नगरसेवकांनी हजेरी लावत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत जेवण केले. आव्हाडांच्या बंगल्यासमोर पक्षकार्यालय सुरू केल्याचा पहिला झटका पचनी पडायच्या आधीच ही जेवणावळ दुसरा झटका मानला जात आहे.
गेल्यावर्षी शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीनंतर ठाण्याने दोन्ही गटातील सर्वाधिक राडे पाहिले आहेत. दबावतंत्राचा अनुभव घेतला. मात्र, राष्ट्रवादी फुटल्यानंतर सर्वत्र चिडीचूपचेच वातावरण होते. फुटीनंतर पहिल्या काही दिवसांमध्ये ठाण्यातील राष्ट्रवादीच्या बहूतेक सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबतच राहण्याचा निश्चय केला. मात्र, काळ जसा पुढे सरकत आहे, तस तसे या निश्चयालाच सुरुंग लागण्यास सुरुवात झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पक्षाचे किती आमदार आहेत, हा आकडा जसा गुलदस्त्यात आहे, तसाच संभ्रम आता ठाण्यातील माजी नगरसेवकांच्या बाबतीतही निर्माण झाला आहे. बुधवारी (ता. ९) ऑगस्टला क्रांतीदिनी ठाण्यात (Thane) राष्ट्रवादी पक्षकार्यालयाच्या उद्घाटनाला सुमारे अडीच हजार कार्यकर्ते उपस्थित असल्याचा दावा खुद्द अजित पवार गटाचे प्रदेश सचिव नजीब मुल्ला यांनी केला.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुंब्य्रातून कार्यकत्यांनी खास बाईक रॅलीही काढली होती. याशिवाय कोपरी, वागळे, माजिवाडा पासून ते जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, व्यावसपीठावर उपस्थित असलेल्या मोरेश्वर केणी आणि मिराज खान यांना पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. हे दोन्ही माजी नगरसेवक मुंब्य्रातील आहेत. मुंब्रा हा आव्हाड यांचा मतदारसंघ असल्याने चर्चेला उधाण आले. पण त्यानंतर झालेल्या जेवणावळीमुळे या चर्चेला खमंग फोडणी मिळाली. मुंब्य्रातीलच आणखी १२ नगरसेवकांनी कार्यक्रमाला हजेरी न लावता थेट 'दावत'साठी नजीब मुल्ला यांच्या घरी पोहचले. तेथे अजित पवार यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद लुटत पुढची रणनिती आखली गेल्याचे समजते.
१७ पैकी १४ माजी नगरसेवक गळाला
मुंब्रा हा आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लावण्याचा पहिला प्रयत्न शिंदे गटाने केला. आता त्याला जोड राष्ट्रवादी अजित पवार गटाची मिळाली आहे. या मतदारसंघातील १७ पैकी १४ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्थन दिल्याचा दावा केला जात आहे. संपूर्ण उद्घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आव्हाड यांचा उल्लेख टाळला. कोणतीच टीका टिप्पणी त्यांनी केली नाही. याला उत्तर म्हणून आव्हाड यांनी 'दादा आभार' असे ट्विट केले आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.