Gunaratan Sadavarte Sarkarnama
मुंबई

मी तुरुंगात 19 दिवस फक्त पाण्यावर काढले! सदावर्तेंचा खळबळजनक दावा

गुणरत्न सदावर्ते यांना ८ एप्रिलला पोलिसांनी पकडलं होतं

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांच्या विरोधात महाराष्ट्रात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हल्ल्याच्याच दिवशी ८ एप्रिलला सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. उच्च न्यायालयाने काल (ता.26) सदावर्ते यांना जामीन मंजूर केल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. यानंतर सदावर्तेंनी तुरुंगात फक्त पाण्यावर दिवस काढल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.

सदावर्ते म्हणाले की, मी जेलमध्ये असताना फक्त पाण्यावर होतो. सरकारला काय करायचं असेल ते करु दे पण तत्वं सोडायची नाहीत. लॉकअपमध्ये गेल्यापासून मी फक्त पाण्यावर आहे. येणाऱ्या काळात कष्टकऱ्यांसाठी मी लढणार आहे. माझी मुस्कटदाबी केली तरीही मी मागे फिरलो नाही. मी तुरुंग नाही तर त्याला सत्याग्रह मानतो. माझ्या वडिलांना मोठा काळ सामान्य नागरिकांसाठी तुरुंगात जावं लागलं होतं, त्यांचा आदर्श माझ्यासमोर आहे.

तुरुंगात असताना मी एसटी कामगारांना पत्र लिहिलं होतं. तुम्ही घाबरु नका, कामावर जा, असं मी त्यांनी सांगिलं होतं, असा दावा सदावर्ते यांनी केला आहे. ते म्हणाले की, माझ्यामुळे कुणाचीही नोकरी धोक्यात आलेली नाही. हे लोक कष्टकरी गिरणी कामगार होतील म्हणत होते ते कुठे गेले? एक रुपयाचा व्यवहार करतानाही चोरीमारी करु नये, अशी शिकवण आमच्या आईने दिली. त्यामुळे चुकीच्या मार्गाने आम्ही पैसे घेत नाही. थोडी फी मिळते तीदेखील आम्ही कायदेशीरदृष्ट्या पाहून घेत आहोत

दरम्यान, सदावर्ते यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये मुंबई, सातारा, कोल्हापूर येथील गुन्ह्यात सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. कोल्हापूर पोलिसांच्या कोठडीची सोमवारी संपल्यानंतर सदावर्ते यांची मुंबईतील आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली होती. सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला. त्यामुळे 19 दिवसानंतर सदावर्ते यांची सुटका झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT