मुंबई

Bala Nandagaonkar: मुंबईतल्या फक्त 27 टक्के मराठी माणसांच्या जीवावर मनसे-शिवसेनेची सत्ता कशी येणार? बाळा नांदगावकरांनी सांगितलं गणित

Bala Nandagaonkar: मराठीच्या मुद्द्यावर उद्धव आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र येऊन मुंबई महापालिका निवडणूक लढावी अशी मराठी माणसाची इच्छा असल्याचं सांगितलं जात आहे.

Amit Ujagare

Bala Nandagaonkar: मराठीच्या मुद्द्यावरुन येत्या ५ जुलै रोजी राज आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी एकत्र येऊन मुंबई महापालिका निवडणूक लढावी अशी मराठी माणसाची इच्छा असल्याचं सांगितलं जात आहे. पण मुंबईत शिल्लक असलेल्या केवळ २७ टक्के मराठी माणसाच्या जीवावर मनसे आणि शिवसेनेची सत्ता येऊ शकेल का? या प्रश्नावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी थेट गणितच सांगितलं आहे. सामटीव्हीवरील 'ब्लॅक अँड व्हाईट' या मुलाखतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

सकाळ मीडियाचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना प्रश्न विचारला की, मुंबईतला मराठी माणूस एकत्र आला तरी मुंबईत केवळ २७ टक्के मराठी मत आहेत. उर्वरित मतं ही साधारण ७० टक्के आहेत. ही ७० टक्के मतं जर तुमच्या वाटेला आली नाहीत तर २७ टक्क्यांच्या बळावर तुम्ही मुंबईचं किंवा महाराष्ट्राचं राजकारण कसं करणार? तुम्ही मुंबई महापालिकेत निवडून कसं येणार? सत्ता स्थापन कशी करणार?

निवडणुकीचं सांगितलं गणित

यावर उत्तर देताना नांदगावकर यांनी सांगितलं की, निवडणूक येतात-जातात. जनाधार हा क्षणिक असतो. विचारधारा ही दीर्घकालिन असते, त्यामुळं विचारधारा घेऊन आपल्याला जावं लागतं. त्यामुळं मुंबईत २७ टक्के मराठी माणूस असला आणि तो एकत्र आला तर आत्ताची जी आकडेवारी पाहिली तर बराच फरक पडू शकतो.

मराठीला मानणारा मोठा वर्ग हा इतर भाषिक आहे. हे इतर भाषिक लोक अजूनही प्रामाणिक आहेत की, ते समजतात की या महाराष्ट्रानं आपल्याला बरंच काही दिलं. मराठी माणसानं आपल्याला दिलंय, त्यामुळं ते देखील मतदान करणारे आहेत. हाच विचार राज्यकर्ते करत नाहीत. म्हणून मराठी भाषिक लोक एकत्र येणं ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज जर मराठी माणसानं ओळखली नाही तर ते भविष्यात आपल्यासमोर येणारं फार मोठं संकट असणार आहे.

हिंदीच्या बाजूनं असलेल्या पक्षांना दाखवला आरसा

हा विषय मुंबई-ठाणे आणि पुण्यापुरता नाही. साडे अकरा ते बारा कोटी मराठी लोक महाराष्ट्रात आहेत. यांपैकी हिंदी भाषिक हे काही निवडक भागांमध्येच आहेत. याचा राज्यकर्त्यांनी विचार करायला हवा. जर हा मराठी माणूस पेटून उठला तर तुम्ही काय कराल? आज महाराष्ट्रात मराठी माणूस आपल्या मातृभाषेसाठी जागा झालेला आहे. जरा ग्रामीण भागात फिरा मग त्यांना कळेल. राज्यकर्ते अजूनही अंधारातच आहेत. ग्रामीण भागातील वातावरण काय चाललंय? हे त्यांना दिसत नाहीए, अशा शब्दांत बाळा नांदगावकर यांनी हिंदी भाषेसाठी अडून बसलेल्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT