Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Thackeray Vs Shinde: ठाकरेंना भेटलोच नाही म्हणत शिंदेंच्या माजी आमदाराने दिलं 'हे' आव्हान

Uddhav Thackeray Vs Eknath Shindes MLA : अधिवेशनात अनेक विरोधक एकमेकांच्या भेटी घेताना दिसत आहेत. शिवाय लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यामुळे आता युतीतील अनेक आमदार घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाही सुरु आहेत.

Jagdish Patil

Mumbai News, 29 June : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन गुरुवारपासून सुरु झालं आहे. अधिवेशनादरम्यान विविध आणि अनपेक्षित राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अधिवेशनात अनेक विरोधक एकमेकांच्या भेटी घेताना दिसत आहेत.

शिवाय लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यामुळे आता युतीतील अनेक आमदार घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाही सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील काही आमदारांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती.

त्याप्रमाणेच शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार गोपीकिशन बजोरिया आणि माजी आमदार विप्लव बजोरिया यांनी देखील शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आपण उध्दव ठाकरेंना भेटल्याचे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचं सांगत, बजोरिया यांनी भेटीबाबतचे वृत्त फेटाळलं आहे.

विधान परिषदेतून निवृत्त झालेले शिवसेना आमदार विप्लव बजोरिया आणि माजी आमदार गोपिकिशन बजोरिया या दोघांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतल्याचं वृत्त काही माध्यमांनी दाखवलं होतं. या वृत्तामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. शिवाय बजोरिया आता घरवापसी करणार की काय? असंही बोललं जात होतं.

मात्र, विधान भवनातील लॉबीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून परतत असताना समोरून उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे येताना दिसले. यावेळी मी त्या दोघांना नमस्कार सुद्धा केला नाही, भेटणं तर खूप दूरची गोष्ट आहे, असं गोपीकिशन बजोरिया यांनी सांगितलं आहे.

'आता ठाकरे गटाची विश्वासाहर्ता संपली आहे. खोट्या बातम्या देऊन खोटी प्रसिध्दी करण्याऐवजी ठाकरेंनी स्वतः पुढे येऊन मी त्यांना भेटलो होतो असं सांगावं', असं आव्हान देखील बजोरिया यांनी ठाकरेंना दिलं आहे. या सर्व प्रकरणासंदर्भात आपण पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे बजोरिया पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT