Dr Amol Kolhe News : Sarkarnama
मुंबई

Dr. Amol Kolhe Speech: पाण्याचा पाऊस पडला तर मातीचा अन् ईडी-सीबीआयच्या पावसाने निष्ठेचा चिखल होतो; अमोल कोल्हेंनी डागली तोफ!

Dr Amol Kolhe On Ajit Pawar : "तुमच्यासाठी वतनावर पाणी सोडायला तयार आहे."

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मेळावा पार पडला. पवारांच्या या बैठकीला एकूण १२ आमदारांचे उपस्थित होते. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे हे प्रमुख नेते उपस्थित झाले आहेत. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसून आला. यावेळी मेळाव्यात अमोल कोल्हे यांनी भाषण करत अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या गटावर आणि भाजपवर सडकून टिका केली.

यावेळी भाषण करताना अमोल कोल्हे म्हणाले, "खरं तर बाहेर पाऊस खूप पडतोय. असं म्हणतात की पाण्याचा पाऊस पडला तर मातीचा मातीचा चिखल होते. आणि ईडी - सीबीआयच्या स्वार्थाचा पाऊस पडला तर निष्ठेचा चिखल होतो. हे आज महाराष्ट्रात बघायला मिळतं. आज शरद पवारांना साहेब यांना साथ द्यायला आपण इतक्या मोठ्या त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो."

"जे रविवारी घडलं ते पहिल्यांदा घडलं नाही. हे वारंवार घडतंय. मात्र हे घडलं म्हणून रडत बसणाऱ्यामधले आम्ही नाही. जेव्हा वाट सोडली जाते, तेव्हा वाट सोडायला दोन कारणं असतात. एकतर शॉर्टकट हे आमिष असतं, नाहीतर पुढे पकडलं जाऊ हा धोका असतो. मात्र या आमिषांना बळी न पडता जे आपल्या वाटेवर आसतात, त्यांच्या पाठीमागे तत्व आणि नैतिकतेचं बैठक असतं," असे अमोल कोल्हे म्हणाले.

कोल्हे पुढे म्हणाले, "अनेक जण म्हणत असतील आमच्या विठ्ठ्लाला बडव्यांनी घेरलंय. पण या महाभागांना पंढरीचा विठ्ठल समजलाच नाही. मनातून निस्सीम भक्ती केली असती तर पांडुरंग पावला असता. त्या दिवशी मी स्वत: राजभवनात होतो. राजभवनातून फोन केला आणि सांगितलं माझा खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. सर्वसामान्य मतदारांनी जो विश्वास दिला, त्या विश्वासाचं काय? हा प्रश्न मनात होता. आज ठामपणे शरद पवारांच्या पाठिमागे उभा आहे. स्वाभिमानाची संस्कृती ही महाराष्ट्राची आहे."

"पुराणाचा एक दाखला आहे, श्रीकृष्णाने गोवर्धन उचललं. गोकुळातल्या लोकांनी जेव्हा देवेंद्रांना अविर्भाग देण्याचं नाकारलं. म्हणून देवेंद्राने वरूणराजाला बरसायला सांगितलं. त्याक्षणी श्रीकृष्णाने गोवर्धन उचलला. तो श्रीकृष्णाने करंगळीवर तोलला की गोपाळ्यांच्या काठ्यांनी तोलला हे आजही सांगता येत नाही. मात्र गोवर्धन तोलायची ती भूमिका बजावायला आज शरद पवार साहेब तयार असताना, गोपाळांची काठी होण्याच्या भाग्य तुम्हाला आणि मला मिळतंय. हे इतिहास कधीही विसरणार नाही," असेही अमोल कोल्हे म्हणाले.

"त्यांच्या (अजित पवार गट) नवीन कार्यालयाचं नवीन जो बंगला देण्यात आलंय त्याला नाव आहे प्रतापगड. या प्रतापगडाच्या लढाईची दोन पात्र फार महत्त्वाची आहेत. प्रतापगडच्या लढाईत अफजल खान असाच आला होता. त्याने फर्मानच सोडला. जर आम्हाला सामील झाला नाहीत, तर घरादाराला नांगर फिरेल. एक फर्मान आलं खंडोजी खोपडेंकडे आणि दुसरं फर्मान गेलं कान्होजी राजे देशमुखांकडे. खंडोजी खोपडेंच्या अंगाल घाम सुटला. ते सरळ अफजल खानाला सामील झाले. कान्होजी जेधे हे छत्रपती शिवरायांकडे आले अन् म्हणाले अशा फर्मांनांची काय पर्वा? तुमच्यासाठी वतनावर पाणी सोडायला तयार आहे. हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT