Praful Patel and Jayant Patil Sarkarnama
मुंबई

Praful Patel On Jayant Patil : 'जयंत पाटील आमच्याबरोबर आले तर स्वागतच...'; प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान

Ganesh Thombare

Delhi News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद थेट निवडणूक आयोगात गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा ? यावर आज सुनावणी पार पडत आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने या सुनावणीसाठी मोठी तयारी केली असून, पक्षाध्यक्ष शरद पवार हे स्वतः निवडणूक आयोगात दाखल झाले आहेत. मात्र, या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठं विधान केलं आहे.

"जयंत पाटील हे आमच्याकडे (अजित पवार गटाकडे) आले तर त्यांचे स्वागत करू", असे म्हणत एक प्रकारे प्रफुल्ल पटेलांनी जयंत पाटलांना ऑफरच दिली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर आता जयंत पाटील काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

निवडणूक आयोगातील सुनावणीआधी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने जोरदार तयारी केली आहे. 53 पैकी 43 विधानसभा आमदार आणि विधान परिषदेचे 9 पैकी 6 आमदार आपल्या बाजूने असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. त्यामुळे आता यावर शरद पवार यांच्या वतीने काय स्पष्टीकरण देण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

"आमच्या वतीने सर्व आमदारांचे प्रतिज्ञापत्र 30 जूनला सादर करण्यात आले आहेत. बहुतांश आमदारांचे प्रतिज्ञापत्र पिटीशनसह दाखल केले आहेत, पण त्यांच्याकडचे आमदार किती आमच्या संपर्कात आहेत हे आता सांगत नाही, जयंत पाटील कुठं जातील हे मला माहीत नाही. मात्र, आमच्याकडे जर आले तर त्यांचे स्वागतच आहे", असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

शरद पवारांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका...

अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर 9 ऑक्टोबरला सुनावणी पार पडणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT