Sudhir Mungantiwar Sarkarnama
मुंबई

Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंनी आपल्याच सरकारला पुन्हा धारेवर धरले; ‘त्यांना डायरेक्ट ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये पाठवा’

Monsoon Session 2025 : मी साधारणपणे 1995 पासून विधानसभेच्या सभागृहात आहे. आपली (विधानसभेच्या कामकाजाची) कार्यक्रमपत्रिका इंग्रजीमध्ये मी तर कधीही बघितलेली नाही.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 03 July : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार हे आपल्याच सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. मंत्रिपदापासून डावलण्यात आल्यानंतर सुधीरभाऊ प्रत्येक अधिवेशनात सरकारला चांगलेच धारेवर धरत आहेत. आज त्यांनी विधानसभेतील कार्यक्रमपत्रिकेच्या इंग्रजी भाषेवरून सरकारला जाब विचारला. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सरकारच्या मदतीला धावून आले आणि सध्या चालू असलेल्या हिंदी-मराठी वादावर मार्मिक भाष्य करत कामकाज पुढे रेटले.

आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, मी साधारणपणे १९९५ पासून विधानसभेच्या सभागृहात आहे. आपली (विधानसभेच्या कामकाजाची) कार्यक्रमपत्रिका इंग्रजीमध्ये मी तर कधीही बघितलेली नाही. आता माझ्याकडील इंग्रजी भाषेतील कार्यक्रमपत्रिका मी तुम्हाला देतो. तेवढ्यात समोरच्या बाकावरून कोणीतरी पहिल्यापासून आहे, असे विधान केले.

त्यावर सुधीरभाऊंनी ‘पहिल्यापासून आहे म्हणजे आएएस अधिकाऱ्यांना आपण मराठी शिकायला लावतो. इकडे मराठी अभिजात भाषा करायची आणि ज्यांना मराठी बोलताना येत नाही, त्यांना हिंदीची संधी असताना त्यांना इंग्रजीची जबरदस्ती करता. मग हिंदीत बोलावं. कार्यक्रमपत्रिका हिंदीत घ्यावी. हिंदीच्या सक्तीला विरोध ठेवायचा आणि इंग्रजीवर प्रेम दाखवून तिला अलिंगन द्यायचं,’ असा रोकडा सवाल केला.

ते म्हणाले, माझा आक्षेप आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम करत असताना इंग्रजीचा प्रभाव असेल तर माझी आपल्याला विनंती आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी एकदा नियम समितीची बैठक घ्यावी. इंग्रजी शब्द जिथं जिथं असेल तो काढून टाकावा. मराठी शिकलीच पाहिजे, ती अभिजात भाषा आहे. एखाद्याला फारच अडचण असेल तर हिंदी आहे. इंग्रजीशिवाय फारच काही समजत नसेल तर त्यांना पासपोर्ट, व्हिसा काढून डायरेक्ट ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये पाठवा, ही कसली पद्धत आहे.

ही इंग्रजीची कार्यक्रपत्रिका आहे, असे सांगून मुनगंटीवार यांनी शिपायांना इंग्रजीतील कार्यक्रपत्रिका दे साहेबांना (विधानसभा अध्यक्षांना) म्हणत साहेबांच्या मागेही कदाचित इंग्रजी जास्त चालतं की काय म्हणत टोला लगावला. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही सध्याच्या वादावर मार्मिक भाष्य केले. ते म्हणाले, सुधीरभाऊ, माध्यमांना मराठी आणि हिंदीबाबत लिहायला भरपूर संधी आहे. आता त्यात इंग्रजी ॲड करू नका, असे म्हणत कामकाज पुढे रेटले.

इंग्रजी कार्यक्रमपत्रिकेची मागणी करणारे ते नऊ आमदार कोण?

इंग्रजीतील कार्यक्रमपत्रिकेबाबत विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, सभागृहाचे कामकाज नियम २२ प्रमाणे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत चालतं. त्या व्यतिरिक्त नऊ आमदारांनी विधानसभेच्या कामकाजाची कार्यक्रम पत्रिका इंग्रजीमध्ये देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT