Ashish Shelar
Ashish Shelar sarkarnama
मुंबई

मुंबईतील ऐतिहासिक वास्तू बिल्डरांच्या घशात... ॲड. आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबईत श्रेणी तीनमध्ये २५० इमारती आणि स्ट्रक्चर तसेच १३ परिसरांत तोडकाम करण्याची परवानगी आयुक्तांनी परस्पर दिली असून यातून बिल्डरांना ७० हजार कोटींचा फायदा करुन दिला जात आहे. मुंबईतील ऐतिहासिक वास्तू तोडून बिल्डरच्या घशात या वास्तू आणि जागा घातल्या जात आहेत, असा आरोप भाजपचे नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केला आहे. दरम्यान, या सगळया प्रकरणात आयुक्त कुणाच्या तरी सांगण्यावरून ही परवानगी देत असून याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी अपेक्षाही ॲड. शेलार यांनी व्यक्त केली आहे.

ॲड. आशिष शेलार यांनी आज भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. ॲड. शेलार म्हणाले, ''महानगर पालिकेच्या घोटाळयांची मालिका वाढत असून ऐकावे ते नवलच या पध्दतीने घोटाळयांची प्रकरणे रोज समोर येत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना आहे. आता नवीन प्रकरण समोर आले आहे, ते भयंकर आहे.

मुंबई शहरात ऐतिहासिक वारसा असलेली जागा, स्थळे, आणि इमारती आहेत. यातील काही ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारती पुरातत्व विभागाकडून संरक्षित केली जातात. या वास्तूंमुळे मुंबईच्या सौंदर्यात भर पडते. आता यामध्ये नवीन घोटाळा समोर आला आहे. ज्यामध्ये मुंबई शहरातील राज्य सरकार नियुक्त हेरिटेज कमिटी अस्तित्वात असताना सुध्दा हेरिटेज श्रेणी तीनमधील वास्तू या हेरिटेज कमिटीच्या परवानगी विना मुंबई महापालिका आयुक्तांनी परस्पर तोडण्यासाठी परवानगी दिली आहे.

जगभरात हेरिटेज स्ट्रक्चर वाचविण्यासाठी प्रयत्न होत असताना शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिकेत ही स्ट्रक्चर तोडण्याच्या परवानगी बिल्डरांना जलदगतीने दिल्या जात आहेत. मुंबईत श्रेणी तीनमध्ये २५० इमारती आणि स्ट्रक्चर असून १३ परिसरांत तोडकाम करण्याची परवानगी आयुक्तांनी परस्पर दिली असून ही कुणाच्या सांगण्यावरुन दिली, असा प्रश्न उपस्थित करून ॲड. शेलार म्हणाले, पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असणा-या या वास्तू तोडण्याची परवागनी दिली जातेय याकडे पर्यटन मंत्र्यांचे लक्ष आहे का? मुंबई आमचीच असा कांगावा करणारे आता या विरोधात का बोलत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यातून बिल्डरांना ७० हजार कोटींचा फायदा करुन देण्यात येत असून ऐतिहासिक वास्तू तोडून बिल्डरांच्या घशात ऐतिहासिक वास्तू आणि जागा घातल्या जात आहेत. या सगळया प्रकरणात आयुक्त कुणाच्या तरी सांगण्यावरुन ही परवानगी देत असून याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी ॲड. शेलार यांनी केली आहे.

खाई त्याला खवखवे...

शिवसेनेचे नगरसेवक व युवा सेनेच्या एका नेत्याच्या जवळचे असलेल्या अमेय घोले नामक नगरसेवकांनी हेरिटेज कमिटी परवानगी देत नाही, म्हणून हेरिटेज कमिटीच बरखास्त करा, अशी मागणी केली आहे. हे महाभंयकर असून या विषयात मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, आयुक्तांना कायद्याची आठवण करुन देतोय. अन्यथा मुंबईच्या सौंदर्यात भर घालणा-या वास्तूंच्या संरक्षणासाठी आम्ही न्यायालयात जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

वांद्रे बसस्टॅन्ड येथील सरकारी भूखंडावर असणारे असेच ऐतिहासिक स्ट्रक्चर तोडण्याची परवानगी आयुक्तांनी दिली हे प्रकरण आम्ही नुकतेच उघड केले आहे, असे सांगून ॲड. शेलार म्हणाले, याबाबत हेरिटेज कमिटी स्वत: आयुक्तांना कळवते की, एवढी प्रकरणे आमच्या परवानगी शिवाय मंजूर कशी होतात. या कमिटीमधील तज्ञ स्वत: सांगत आहेत की आम्हाला बाजूला ठेवून हे निर्णय घेतले जात आहेत तरीही पालिका आयुक्त ऐकायला तयार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT