Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

India Alliance : भाजपच्या हिंदुत्वाला कडवे आव्हान; आघाडीने भात्यातून काढला रामबाण, खेळणार हुकमी डाव!

Uddhav Thackeray Is India Alliance Hindutva Face : लोकसभा निडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी इंडिया 'आघाडी' मोठा डाव खेळणार आहे...

Sachin Fulpagare

संजय परब-

Maharashtra Politics Latest News : लोकसभा निवडणुका तोंडावर असताना आता सत्ताधारी आणि विरोधक तयारीला लागले असून दोन्हीकडून रणनीती निश्चित केली जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जनयात्रेपूर्वी 'इंडिया' आघाडीच्या जागावाटपाचा प्रश्न निकालात काढण्यात येईल आणि इंडिया आघाडीतील प्रत्येक प्रमुख नेत्याकडे प्रचाराची धुरा ठरवण्यात येणार आहे. यातील विशेष बाब म्हणजे उबाठा Shiv Sena प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे इंडिया आघाडीच्या हिंदुत्व प्रचाराची मुख्य धुरा सोपवली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भाजपच्या मोठ्या आव्हानाचा मुकाबला करण्यासठी 'इंडिया' आघाडी पुढे सरसावली आहे. 22 जानेवारीला राम मंदीरचा सोहळा अयोध्येत होत असून हा सोहळा म्हणजे भाजपच्या निवडणूक प्रचाराचे बिगुल असणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा सोहळा घेत भाजपने लोकांचे लक्ष फक्त आपल्याकडे राहील, याची काळजी घेतली आहे. यात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील फोकस एक अंश देखील कमी होणार नाही, हे पाहिलं जातंय. प्रमुख विरोधी नेत्यांना अजून या सोहळ्याचे निमंत्रण आलेले नाही. एकूणच साध्या निमंत्रणाचा विचार करता भाजप राजकारणाच्या कुठल्या थरावर जाऊन पोहचला आहे, हे लक्षात येते. हे सर्व ध्यानात ठेवून आता विरोधक कामाला लागले असून यात उद्धव ठाकरे भाजपच्या हिंदुत्वाला जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज होत आहे.

आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नसून हृदयात राम आणि हाताला काम, अशी आक्रमक भूमिका याआधी स्पष्ट करणारे उद्धव आता काश्मीरपासून केरळपर्यंत हाच मुद्दा लोकांपर्यंत घेऊन जातील आणि तशी व्युहरचना तयार करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जहाल हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे देशातील जनतेचे लक्ष ते वेधून घेत असत. आता तशीच भूमिका घेत उद्धव ठाकरे देशभर प्रचाराचे रान उठवतील. आपल्या फायद्याचा विचार करत भाजप सोयीने हिंदुत्वाचे राजकारण कसे करत आहे, याचा भांडाफोड या निमित्ताने उद्धव करतील, असे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, केजरीवाल अशा प्रमुख नेत्यांच्या साथीने उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्र ही राज्ये 'इंडिया' आघाडीला पोषक असून आपला पाया मजबूत करत मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हरयाणा, आसाम, ओरिसा, छत्तीसगडसह पूर्वांचल राज्यांमध्ये इंडिया आघाडी प्रचाराचा जोर मारणार आहे. मध्य भारतात हिंदुत्वाच्या प्रचारावर अधिक लक्ष ठेवून उद्धव ठाकरे यांच्याकडे या भागाची जबाबदारी देण्यात येईल, असे कळते.

दरम्यान, जागावाटपाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जागावाटपापेक्षा भाजपला पराभूत करणं महत्त्वाचं आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच उद्धव ठाकरे पुढच्या काही दिवसांमध्ये दिल्लीत बैठकीसाठी जाणार आहेत.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT