Shiv sena UBT MP Sanjay Raut addressing the media while criticizing the India-US trade deal and its impact on Indian farmers and sovereignty. Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : 'मोदींनी भारताला अमेरिकेचं गुलाम केलं, ते इतके नतमस्तक का झाले? तर 'एपस्टिन फाईल...', राऊतांचा गंभीर दावा

Sanjay Raut on India-US Trade Deal : 'संपूर्ण भारतीय बाजार अमेरिकन उत्पादनांसाठी खुला केल्यावर भारतीय उद्योग, व्यापाराचे रक्षण कसे होणार? संपूर्ण भारतीय बाजारात अमेरिकेचाच ‘माल’ आल्यावर ‘मेक इन इंडिया’ व आमच्या देशी कंपन्यांचे काय होणार? ‘स्टार्टअप इंडिया’, ‘कौशल विकास योजनां’चा तर बोऱ्याच वाजला.'

Jagdish Patil

Mumbai News, 08 Feb : 'अमेरिकेशी केलेला व्यापार करार हा सरळ राष्ट्रद्रोह आहे. 15 आागस्ट 1947 च्या मध्यरात्री देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पंडित नेहरू यांनी भारतवर्षाला सार्वभौम व सुखी ठेवणारा ‘नियतीशी करार’ केला. मोदी यांनी हा करार मोडून भारताला अमेरिकेचे गुलाम केले', अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'सामना'तील रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मोदी सरकारने अमेरिकेशी केलेल्या व्यापार करारावरून त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. राऊतांनी लिहिलं की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 15 आागस्ट 1947 ला भारताच्या संविधान सभेत स्वातंत्र्याच्या प्रसंगी ऐतिहासिक आणि भावनिक भाषण केले. ‘नियतीशी करार’ म्हणून ते जगभरात प्रसिद्ध आहे. संपूर्ण जग झोपलेले असताना भारत एका नवीन युगाच्या उंबरठ्यावर उभा होता. जुने सर्व सोडून नव्या युगात पाऊल टाकताना भारताला एका मुक्त, सार्वभौम राष्ट्राच्या रूपात स्थापित करण्याची प्रतिज्ञा होती.

स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू झाला होता. भारत चैतन्याच्या युगात प्रवेश करत असल्याचे नेहरूंनी स्पष्ट केले. ‘ट्रीस्ट विथ डेस्टिनी’ म्हणजेच नियतीशी झालेला करार पंतप्रधान मोदी व त्यांच्या लोकांनी आता मोडला आहे. भारतीय शेतकऱ्यांना गुलामीच्या विहिरीत ढकलणारा व्यापारी करार पंतप्रधान मोदी यांनी प्रेसिडंट ट्रम्प यांच्या बरोबर केला. या गुलामीच्या कराराबद्दल भाजप आनंद उत्सव साजरा करीत आहे. हा कसला विकृत आनंद आहे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

तर भारताशी झालेल्या व्यापार करारात ट्रम्प यांनी भारताला जोडे मारले आहेत आणि मोदी व त्यांचे लोक ‘थँक यू, थँक यू’ म्हणत उत्सव साजरा करीत आहेत. तेही भारतीय करदात्यांच्या पैशांवर, असे व्यंगचित्रकार मंजूल यांनी म्हटले ते खरेच आहे. चार महिन्यांपासून रखडलेला अमेरिकेशी व्यापार करार मोदी यांनी घाईघाईने उरकला व असा करार भारताबरोबर झाल्याचे सगळ्यात आधी अमेरिकेने अत्यंत खुशीत जाहीर केले. पाकिस्तानशी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असताना ‘सीझफायर’ झाल्याची घोषणाही ट्रम्प यांनी आधी केली होती.

आता व्यापारी कराराचे तेच झाले. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या कृषिमंत्र्यांनी या कराराने त्यांच्या देशाचा कसा फायदा झाला ते सांगितले. भारतीय पंतप्रधान हा करार आपल्या फायद्याचा आहे असे सांगू शकतील काय? असा सवाल उपस्थित करत ट्रेड डीलमुळे भारतावरील टॅरिफ 50 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आणले. हा विजय असल्याचे सांगितले गेले ते असत्य आहे. आतापर्यंत भारतावर सरासरी 3 टक्क्यांपेक्षा कमी टॅरिफ अमेरिकेकडून लागत होते. अमेरिका भारतीय एक्सपोर्टवर यापुढे 18 टक्के टॅरिफ लावणार.

भारत अमेरिकेतून भारतात येणाऱ्या मालावर ‘शून्य’ टारिफ लावणार. आतापर्यंत भारत अमेरिकेच्या मालावर 30 ते 100 टक्के टारिफ लावत असे. हा आता भारतासाठी घाट्याचा सौदा झाला. भारत यापुढे अमेरिकेतून 500 कोटी डॉलर्सची ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी उत्पादने आणि कोळसा, इतर गोष्टींची खरेदी वाढवेल. त्यामुळे इतर मित्रदेशांबरोबरचे भारताचे व्यापारी संबंध कमी होतील. भारतीय बाजारावर पूर्णपणे अमेरिकेचे नियंत्रण राहील, असा दावाही राऊतांनी सामनात केला आहे.

तर अमेरिकेबरोबरचा करार हा देश गहाण टाकणारा करार आहे. मोदी यांनी कोणाची परवानगी घेऊन हा करार केला? चार महिन्यांपूर्वी ट्रम्प यांनी भारतावर काही अटी टाकल्या. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी. तेव्हा मोदी म्हणाले, “कोणाकडून तेल घ्यायचे ते भारत ठरवेल.” आता मोदींनी ट्रम्प यांची अट मान्य केली. अमेरिकेची कृषी उत्पादने भारतीय बाजारात येऊ देणार नाही ही मोदी सरकारची भूमिका आता मोडून पडली.

संपूर्ण भारतीय बाजार अमेरिकन उत्पादनांसाठी खुला केल्यावर भारतीय उद्योग, व्यापाराचे रक्षण कसे होणार? संपूर्ण भारतीय बाजारात अमेरिकेचाच ‘माल’ आल्यावर ‘मेक इन इंडिया’ व आमच्या देशी कंपन्यांचे काय होणार? ‘स्टार्टअप इंडिया’, ‘कौशल विकास योजनां’चा तर बोऱ्याच वाजला. या ट्रेड डीलनंतर अमेरिकेच्या कृषी सचिवांनी आनंद व्यक्त केला. त्यामुळे एक गोष्ट साफ आहे. भारतीय शेतकऱ्यांचा बळी देऊन मोदींनी अमेरिकन शेतकऱ्यांचा फायदा करून दिला.

ब्रिटिश व्यापारी म्हणून आले व भारतावर ताबा मिळवून आम्हाला गुलाम केले. तेच चित्र आता अमेरिकेच्या बाबतीत दिसत आहे. मोदी इतके नतमस्तक का झाले? तर ‘एपस्टिन फाईल’ नावाच्या ‘ब्लू फिल्मसह’ फाईल्समध्ये भारताबाबत बराच मालमसाला येऊ घातला आहे. राहुल गांधी यांनी हे बिंग आधीच फोडले आहे. त्यामुळे स्वत:ला वाचविण्यासाठी भारत देशाला अमेरिकेचा गुलाम करण्याचा करार पंतप्रधान मोदी व त्यांच्या लोकांनी केल्याची टीका राऊतांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT